पिंपरीत गुजरातमधून किराणा मालासह आणलेला '२५ लाखांचा' गुटखा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 21:24 IST2021-11-01T21:24:42+5:302021-11-01T21:24:53+5:30
पोलिसांनी २५ लाख ६१ हजार ९३३ रुपयांचा गुटखा, ४६ हजारांचे चार मोबाईल, ३४ लाख ५० हजारांचा कंटेनर व टेम्पो, असा एकूण ६० लाख ६५ हजार ९३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

पिंपरीत गुजरातमधून किराणा मालासह आणलेला '२५ लाखांचा' गुटखा जप्त
पिंपरी : गुजरात येथून किराणा मालासह आणलेला २५ लाख ६१ हजार ९३३ रुपयांचा गुटखा जप्त केला. तसेच तीन आरोपींना अटक केली. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंबळी फाटा येथे पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि. ३०) ही कारवाई केली.
मोहनलाल प्रल्हाद किर (वय २४, रा. चिंबळी फाटा, पुणे), मोहम्मद मझहर अस्लम (वय २८, रा. उत्तर प्रदेश), ओमजी उर्फ उमेश उर्फ ओमप्रकाश धारुराम चौधरी (वय ३७, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) या तिघांना पोलिसांनीअटक केली. त्यांच्यासह सुजाराम धारुराम चौधरी (वय २६, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), राजेशभाई सुपारीवाले (रा. अहमदाबाद, गुजरात), संतोष अग्रहारी (रा. म्हाळुंगे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस नाईक विजय दौंडकर यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहनलाल याच्या कंटेनरमध्ये गुजरात येथून किराणाच्या मालासह प्रतिबंधित गुटखा आणला असून, चिंबळी फाटा येथील श्रीनाथ कार्गो प्रा. लि. येथे गोदामात व टेम्पोमध्ये गुटखा भरला जात आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. यात पोलिसांनी २५ लाख ६१ हजार ९३३ रुपयांचा गुटखा, ४६ हजारांचे चार मोबाईल, ३४ लाख ५० हजारांचा कंटेनर व टेम्पो, असा एकूण ६० लाख ६५ हजार ९३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, पोलीस निरीक्षक सतीश पवार, सहायक निरीक्षक प्रशांत महाले, उपनिरीक्षक राजन महाडीक आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.