टँकरच्या धडकेनंतर डोक्यावरून गेले चाक; दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 12:44 IST2023-09-21T12:44:16+5:302023-09-21T12:44:25+5:30

पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे बुधवारी (दि. २०) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला

The wheel went over the head after the collision with the tanker Unfortunate death of a biker | टँकरच्या धडकेनंतर डोक्यावरून गेले चाक; दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

टँकरच्या धडकेनंतर डोक्यावरून गेले चाक; दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी : भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे बुधवारी (दि. २०) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. 

मिंटूसिंग हिम्मतसिंग नारंग (४९) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हर्षमीत कौर मिंटूसिंग नारंग (२०, रा. रविवार पेठ, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. टँकरचालक संतोष किसनराव होनराव (रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, पुणे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षमीत कौर यांचे वडील मिंटूसिंग हे बुधवारी दुपारी पुणे-मुंबई महामार्गावरून चिंचवड येथे कंपनीच्या कामानिमित्त जात होते. त्यावेळी दुपारी चारच्या सुमारास फुगेवाडी येथे चालक संतोष होनराव याच्या ताब्यातील भरधाव टँकरने मिंटूसिंग यांच्या दुचाकीला जोरात धक्का दिला. त्यामुळे मिंटूसिंग हे दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर त्यांच्या डोक्यावरून टँकरचे चाक जाऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी पोलिसांना सांगितले.

 

Web Title: The wheel went over the head after the collision with the tanker Unfortunate death of a biker