कासारसाई धरणात थेरगावातील विद्यार्थी बुडाला; पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने गमावला जीव
By प्रकाश गायकर | Updated: July 19, 2024 19:47 IST2024-07-19T19:46:58+5:302024-07-19T19:47:19+5:30
४ मित्रांसमवेत धरणात गेले असता पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने पाण्यात उतरला आणि अंदाज नाल्याने बुडाला

कासारसाई धरणात थेरगावातील विद्यार्थी बुडाला; पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने गमावला जीव
पिंपरी : थेरगाव येथील एम एम ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणारे पाचजण कासारसाई धरणावर गेले. तिथे पोहत असताना एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १९) सकाळी घडली. सारंग रामचंद्र डोळसे (वय १७, रा. थेरगाव) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, सारंग हा थेरगाव येथील एम एम ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकतो. शुक्रवारी सारंग आणि त्याचे चार मित्र कॉलेजला दांडी मारून कासारसाई धरणावर गेले. तिथे पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने सारंग पाण्यात उतरला. तो खोल पाण्यात गेला. तिथे त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी स्थानिकांना माहिती दिली. स्थानिकांनी शिरगाव पोलिसांना कळविले. त्यानंतर शिरगाव पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थांना माहिती दिली. त्यानुसार निलेश गराडे, कुणाल दाभाडे, अविष्कार भिडे, सुशांत नगीणे, विकास दोड्डी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सारंग याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे.