थेरगावामधील घरफोडीच्या घटना रोखा; सोसायटी धारकांची पोलिसांना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 11:47 IST2024-12-24T11:47:39+5:302024-12-24T11:47:59+5:30
थेरगाव भागात पोलिसांची गस्त वाढवणे व परिसरात रात्री नाकाबंदी या सारख्या उपाययोजना करण्याची विनंती धारकांनी केली आहे

थेरगावामधील घरफोडीच्या घटना रोखा; सोसायटी धारकांची पोलिसांना विनंती
वाकड : थेरगाव आणि परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये घरफोडी आणि चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पुढे अशा घटना घडू नयेत यासाठी त्वरित कार्यवाही करावी या मागणीसाठी, थेरगाव डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने थेरगाव परिसरातील अठ्ठेचाळीस सोसायट्यांच्या वतीने काळेवाडी पोलिस स्टेशन व वाकड पोलिस स्टेशन या ठिकाणी भेट दिली. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्यासोबत चर्चा केली. थेरगाववासीयांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची विनंती केली.
थेरगाव डेव्हलपमेंट फाऊंडेशनने पोलिसांना थेरगाव भागात पोलिसांची गस्त वाढवणे व परिसरात रात्री नाकाबंदी या सारख्या उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. थेरगाव येथील गंगा मेडोज सोसायटीमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीची घटना, थेरगावमध्ये दरोड्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या गुन्ह्यात चार दरोडेखोरांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. समर्थ करीना सोसायटी आणि रॉयल कॅसल येथे देखील अशाच घटना घडल्या आणि आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये चोरी, घरफोडीचे प्रयत्न झाले होते.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना नक्कीच करतील. तसेच नागरिकांनी सुद्धा या विषयी जागरूक राहून संशयास्पद घटनेच्या माहितीबाबत तत्काळ ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.