ऐन निवडणुकीत पिंपळे सौदागरमध्ये दुचाकीस्वाराच्या बॅगेत सापडली १५ लाखांची रोकड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 09:53 IST2026-01-10T09:52:51+5:302026-01-10T09:53:50+5:30
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पिंपळे सौदागरमध्ये १५ लाखांची रोकड जप्त

ऐन निवडणुकीत पिंपळे सौदागरमध्ये दुचाकीस्वाराच्या बॅगेत सापडली १५ लाखांची रोकड
पिंपरी : पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौकात दुचाकीवरून चाललेल्या तरुणाच्या बॅगेत १५ लाख रुपयांची रोकड सापडली. त्यामध्ये परदेशी चलनातील दोन लाख, तर भारतीय चलनातील बारा लाख रुपयांची रोकड आहे. तरुणासह ही रक्कम सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतली.
सांगवी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी याबाबत माहिती दिली. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौकात बंदोबस्तावर असलेल्या सांगवी पोलिसांना एक संशयित दुचाकी जाताना दिसली. पोलिसांनी दुचाकीला अडविले. दुचाकीस्वाराच्या खांद्यावर असलेल्या बॅगची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये परदेशी चलनातील दोन लाख, तर भारतीय चलनातील १२ लाख रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेतली. दुचाकीस्वाराकडे चौकशी केली असता त्याने आपला फॉरेन करन्सी एक्स्चेंजचा व्यवसाय असल्याचे सांगितले.
सांगवी पोलिसांकडून परकीय चलन विभागाच्या आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पडताळणी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती कोळी यांनी दिली.