पिंपरी - चिंचवडचे जनजीवन विस्कळीत; मंदिरे, उद्यानं आणि झोपड्यांमध्ये शिरले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 20:37 IST2021-07-22T20:28:42+5:302021-07-22T20:37:09+5:30
पवना धरणातील पाणीसाठ्यात ९.९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा ५५.०७ टक्के झाला आहे.

पिंपरी - चिंचवडचे जनजीवन विस्कळीत; मंदिरे, उद्यानं आणि झोपड्यांमध्ये शिरले पाणी
पिंपरी : गेल्या दोन दिवसातील संततधार पावसामुळे औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली आहे. पवना नदी तीरावरील मोरया गोसावी मंदिर आवारात पाणी शिरले आहे. पवना धरणातील पाणीसाठ्यात ९.९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा ५५.०७ टक्के झाला आहे. पवनानदीला पूर आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांची पाणी पातळी वाढली आहे. पवना नदीवरील थेरगाव येथील केजूदेवी मंदिर आणि चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराच्या आवारात पाणी आले आहे. तसेच जिजाऊ उद्यानाच्या काही भागात पाणी शिरले आहे. शहर परिसरातील नाल्यांमधूनही पाणी वाढले आहे. शहरातील उपनगरात रस्यांची कामे सुरू असल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
रस्ता बंद
पवना नदीतीरी असणाऱ्या पिंपरीतील काळेवाडी पुलालगतच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच बोपोडीतून औंध रस्त्यांकडे जाणाऱ्या पुलाखाली पाणी शिरले आहे. त्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच पावसामुळे शहरातील काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. तर चिंचवड परिसरातील वीज काही काळ गायब झाली होती.
पवना धरण भरले पन्नास टक्के
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. मागील चारपाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत पवना धरण क्षेत्रात २३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा ३४.९६ टक्के होता. यंदा एक जूनपासून पाणीसाठ्यात २३.४८ टक्के वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठ्यात ९.९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सावधानतेचा इशारा
पाऊस सुरू असला तरी धरणे भरलेली नाहीत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग केलेला नाही. नद्यातील सकाळी वाढलेले पाणी दुपारनंतर कमी झाले आहे. पाऊसही कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आपत्तीनिवारण कक्षाने नदीकाठच्या नागरिकांना केले आहे.