पिंपरी : महापालिका हद्दीत पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. अनेकांनी अनधिकृत नळजोडणी करत पाण्याचा वापर सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे; कारण शहरात दररोज ६३० एमएलडी पाण्याचा पुरवठा करूनही तो अपुरा व कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महापालिकेकडून भोसरी, चिंचवड आणि पिंपरीत घरोघरी नळ कनेक्शन सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये तीन महिन्यांत सुमारे ९५०० नळ कनेक्शन अनधिकृत आढळून आली आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरात बोगस नळ कनेक्शनधारकांची शोधमोहीम सुरू आहे. महापालिका हद्दीतील आठही प्रभागांत घरोघरी प्रत्येक नळ कनेक्शनची पाहणी करण्यात येत आहे. नळ कनेक्शन अनधिकृत असेल नळजोडणी अधिकृत केली जात आहे. प्रत्येक ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहे. त्यामुळे पाणीवापराचे प्रमाण कमी होऊन बिल अचूक होण्यास मदत होणार आहे.
महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून यापूर्वी ९२६८ नळ जोडण्यांना स्मार्ट वॉटर मीटर बसविण्यात आले. मात्र, आणखी एक लाख साठ हजार जोडण्यांना स्मार्ट वॉटर मीटर बसविले गेली नाहीत. हा सगळा खर्च १४० कोटींवर जाणार आहे. आता असे मीटर बसवण्याची मोहीम सुरू केली आहे. मीटरमुळे पाणीगळती रोखण्यास मदत होणार आहे.
स्काडा प्रणालीचे अपयश?शहरात समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा, याकरिता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सुपरवायजरी कंट्रोल अँड डाटा ॲक्विझिशन (स्काडा) प्रणाली सुरू केली, तरीही तब्बल ४० टक्के पाण्याची गळती व चोरी होत आहे. त्याचा शोध घेण्यात स्काडा प्रणालीला यश आलेले नाही. पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम व नियोजनपूर्वक करण्यासाठी यापूर्वी स्मार्ट सिटी कंपनीने शहरातील ९२६८ नळांना स्मार्ट वॉटर मीटर बसविले आहेत. हे मीटर मोठ्या हाऊसिंग सोसायट्या, बंगलो व उच्चभ्रू वस्ती, तसेच जेथून मीटर चोरीला जाणार नाहीत, त्याची नासधूस होणार नाही, अशा भागांत बसविण्यात आले आहेत.
घरोघरी जाऊन नळजोडणीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. नळजोडणी अनधिकृत आढळून आल्यास ती अधिकृत करून मीटर बसवण्यात येत आहे. मीटरसाठी ईएमआयची सोय उपलब्ध केली आहे. खराब मीटर बदलण्यात येत आहेत. घरगुती व व्यावसायिक जोडणीला मीटर बसवण्यात येतील. बैठी घरे, सर्व सोसायट्या, झोपडपट्टी यांसह व्यावसायिक सर्वेक्षण केले जात आहे. - प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग
शहरातील एकूण अधिकृत नळजोड - १ लाख ७१ हजार ०९६निवासी - १ लाख ४४ हजार १४४
हाऊसिंग सोसायटी - १९ हजार ६८८वाणिज्य - ६ हजार ७७२
शैक्षणिक व निमसरकारी - २४०पिंपरी-चिंचवड महापालिका - १०७
धार्मिक स्थळे, आश्रम, वृद्धाश्रम - १४५