पिंपरी : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओत) नुकताच २३ लाख वाहन नोंदणीचा टप्पा ओलांडला आहे. औद्योगिक नगरीत दिवसेंदिवस वाहन खरेदीत वाढ होत आहे. यावर्षी तब्बल १ लाख ८५ हजार वाहनांची नोंद झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत वाहन खरेदीमध्ये ४ टक्के वाढ झाली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी दुचाकी खरेदीत ६ टक्के वाढ झाली आहे. मात्र, कार खरेदीत घट झाल्याचे दिसून येते. मागच्या वर्षी ४५,८७७ कारची खरेदी झाली होती. तर यावर्षी ४४,१५१ कारची खरेदी झाली आहे.
पिंपरी-चिंचवड आरटीओच्या हद्दीत पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, मावळ आणि लोणावळा तालुक्यांचा समावेश होतो. आरटीओत सध्या २३ लाख १ हजार ८६० वाहन खरेदीची नोंद झाली आहे. त्यामध्ये दुचाकींचे सर्वाधिक प्रमाण आहे. कोरोनापूर्वी प्रत्येक वर्षी वाहन खरेदीमध्ये वाढ होत होती; पण वर्ष २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर वाहन खरेदीला ब्रेक लागला होता. यावर्षी वाहन खरेदीचे प्रमाण ३० टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले होते. त्यानंतर २०२१ मध्ये देखील कोरोनाची दुसरी लाट असल्याने वाहन खरेदी पूर्वपदावर आलेली नव्हती. मात्र, २०२२ मध्ये २०२१ च्या तुलनेत तब्बल ३८ टक्क्यांनी वाहन खेरदी वाढली होती. वाहन खरेदीचा वेग २०२३ मध्ये कायम होता. २०२३ मध्ये २०२२ च्या तुलनेत १८.७८ टक्के वाहन खरेदी वाढली होती. २०२४ मध्ये वाहन खरेदी वाढली असली तरी वाहन खरेदीचा टक्का मात्र घसरला आहे. २०२४ मध्ये १ लाख ८४ हजार ६९९ वाहनांची खरेदी झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत केवळ ४ टक्के म्हणजेच ६ हजार ८७६ वाहनांची जादा खरेदी झाली.
वर्षात १ लाख १३ हजार दुचाकींची वाढ
पिंपरी-चिंचवड शहरात २०२४ मध्ये १५ डिसेंबरपर्यंत एकूण १ लाख ८४ हजार ६९९ वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये ६ हजार ४१ रिक्षा, १ हजार ४ मालवाहतूक रिक्षा, ९ हजार १५७ मालवाहतूक वाहने, ६ हजार १२९ कॅब, १ हजार २४७ बस, ४४ हजार १५१ कार आणि १ लाख १३ हजार ३०३ दुचाकींची नोंद झाली आहे.
पिंपरी आरटीओने ओलांडला २३ लाख वाहन नोंदणीचा टप्पा
वर्षे - वाहनांची नोंदणी
२०१९ - १,४६,१७३२०२० - १,०१,४०८२०२१ - १,०७,८११२०२२ - १,४९,७०५२०२३ - १,७७,८२३२०२४ - १,८४,६९९एकूण - २३,०१,८६०
आरटीओतील एकूण वाहनांची नोंदणी
दुचाकी - १५ लाख ६६ हजार ६८४तीनचाकी - ४२ हजार १२४मोटर कार - ४ लाख ८५ हजार ३६७मालवाहतूक वाहने - १ लाख १२ हजार ९३८बस - १५ हजार २२४मोटर कॅब - ३२ हजार ६७३ॲम्ब्युलन्स - २ हजार ७२
इंधननिहाय वाहनांची एकूण संख्या
पेट्रोल - १७,२८,२२८डिझेल - ३,०७,८९२सीएनजी - २९,३१७एलएनजी - २७२इथेनॉल - ४इलेक्ट्रिक - ५१,१७०सोलार - २५