पिंपरी चिंचवड आरटीओत २०२५ मध्ये रेकॉर्डब्रेक; २.१८ लाख वाहन नोंदणी, १२१९ कोटींचा महसूल जमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:43 IST2026-01-02T12:41:17+5:302026-01-02T12:43:06+5:30
सध्या इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहक पसंती देत असून २०२५ मध्ये १४ हजार ३११ इलेक्ट्रिक, तर ९,६६३ सीएनजी वाहनांचीही नोंदणी झालेली आहे

पिंपरी चिंचवड आरटीओत २०२५ मध्ये रेकॉर्डब्रेक; २.१८ लाख वाहन नोंदणी, १२१९ कोटींचा महसूल जमा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालयात (आरटीओ) २०२५ मध्ये रेकॉर्डब्रेक २ लाख १८ हजार २८२ वाहनांची नोंदणी झाली. वर्षभरात १२१९ कोटी १४ लाखांचा महसूल जमा झाला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीलाही वेग आला आहे. शहरात आता एकूण वाहन संख्या २५ लाख १६ हजारांवर पोहोचली आहे.
गेल्या पाच वर्षांत पिंपरी चिंचवड आरटीओत वाहन नोंदणीमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. वाहन नोंदणी, फॅन्सी नंबर, पर्यावरण कर, विविध परवाने यातून महसूल मिळत असतो. २०२२ मध्ये ८२२ कोटी २० लाख ६३ हजार ४५४ रुपये, २०२३ मध्ये ९७८ कोटी १९ लाख ८८ हजार ९५२ रुपये, २०२४ मध्ये १,०९५ कोटी ४७ लाख ५४ हजार ९७३ रुपये, तर २०२५ मध्ये १,२१९ कोटी १४ लाख ४३ हजार ७१७ रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
२०२५ मध्ये १ लाख ३३ हजार ११७ दुचाकी, ५२ हजार ३९८ मोटारी, ६ हजार ९१२ ऑटो रिक्षांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या २९ हजार ४३७ वाहतूक वाहनांमध्ये १० हजार ९०४ मालवाहतूक वाहनांचा समावेश आहे.
वर्ष = एकूण नवीन वाहन नोंदणी = महसूल
२०२२ == १,४९,३०० == ८२२ कोटी २० लाख ६३,४५४
२०२३ == १,७७,०७३ == ९७८ कोटी १९ लाख ८८,९५२
२०२४ == १,९१,६०२ == १०९५ कोटी ४७ लाख ५४,९७३
२०२५ == २,१८,२८२ == १२१९ कोटी १४ लाख ४३,७१७
इलेक्ट्रिक वाहनांना पसंती
सध्या इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहक पसंती देत असून २०२५ मध्ये १४ हजार ३११ इलेक्ट्रिक, तर ९,६६३ सीएनजी वाहनांचीही नोंदणी झालेली आहे.
२०२५ मध्ये वाहन नोंदणीत १३.९२ टक्क्यांनी वाढ झाली असून १२१९ कोटी १४ लाख ४३ हजार ७१७ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. २ लाख १८ हजार २८२ वाहनांची विक्रमी नोंद झाली आहे. - राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी