पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई; तब्बल २ कोटींचे एमडी जप्त

By प्रकाश गायकर | Published: March 1, 2024 07:06 PM2024-03-01T19:06:11+5:302024-03-01T19:07:03+5:30

पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्स तस्करी विरोधात कारवाई केली असून आरोपीकडून दोन कोटी 2 लाखांचे ड्रग्स आणि एक मोबाईल जप्त केला आहे

Pimpri-Chinchwad Police take action after Pune city As much as 2 crore MD seized | पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई; तब्बल २ कोटींचे एमडी जप्त

पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई; तब्बल २ कोटींचे एमडी जप्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलिसांनी पिंपळे निलख येथून एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल 2 कोटी 2 लाख रुपये किंमतीचे 2 किलो मेफेड्रोन ड्रग्स जप्त केले आहे. शुक्रवारी (दि. 1) पहाटे साडेचार वाजता रक्षक चौक, पिंपळे निलख  येथे ही कारवाई करण्यात आली. नमामी शंकर झा (वय 32, रा.  निगडी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्स तस्करी विरोधात कारवाई केली असून आरोपीकडून दोन कोटी 2 लाखांचे ड्रग्स आणि एक मोबाईल जप्त केला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पाटील हे पिंपळे निलख भागात गस्त घालत होते. दरम्यान रक्षक चौकाच्या पुढील बाजुस डी.पी. रोड पिंपळे निलख येथे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हातामध्ये पांढऱ्या रंगाची पिशवी असलेला एक व्यक्ती त्यांना पाहून घाईघाईने निघून जाऊ लागला. त्यांना संशय आल्याने त्यांनी अतिरिक्त स्टाफ मागवून घेतला. त्यांच्या मदतीने त्या अनोळखी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या हातातील पिशवीबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने पिशवीमध्ये एम.डी. हा अंमली पदार्थ असल्याचे कबूल केले.
  
तपास पथकातील स्टाफ व दोन पंच बोलावुन त्याच्या ताब्यातील पिशवीची झडती घेण्यात आली. त्यामध्ये 2 कोटी 2 लाख रुपये किंमतीचा 2 किलो 38 ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ तसेच 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले. याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास चालू आहे. आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Pimpri-Chinchwad Police take action after Pune city As much as 2 crore MD seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.