पिंपरी : महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हसाठी बसवलेल्या उघड्या पाइपमध्ये पाय अडकून ५० वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना काळेवाडी येथे बुधवारी (दि. १३ मे) घडली. अग्निशमन दलाने अडीच तास शर्थीचे प्रयत्न करून महिलेची सुटका केली. प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
सुमिता भगवान कासारे (वय ५५, रा. छत्रपती संभाजीनगर) असे जखमी महिलेचे नाव आहे. सुमिता कासारे या काळेवाडी-कोकणेनगर येथे भावाच्या घरी आयोजित ‘जागराण गोंधळ’ कार्यक्रमासाठी आल्या होत्या. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्या मूळ गावी परतण्यासाठी बसथांब्याकडे निघाल्या होत्या. पंचनाथ चौकातून जात असताना, रस्त्यावर पडलेल्या एका रिकाम्या पोत्यावर त्यांनी पाय दिला. मात्र, त्या पोत्याखाली ६ ते ८ इंच व्यासाचा उघडा पाइप होता. सुमिता यांचा पाय पाइपमध्ये अडकला. त्यामुळे त्या जमिनीवर कोसळल्या.
अग्निशमन दलाचे बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी ऋषिकेश चिपाडे आणि त्यांच्या पथकाने धाव घेतली. मात्र, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने कामात अडथळे येत होते. पाइपभोवती खोदण्यासाठी वेळेवर जेसीबी उपलब्ध न झाल्याने, जवानांनी पहारीच्या साहाय्याने जमीन खोदून पाइप कापण्यास सुरुवात केली. पाय पाइपमध्ये घट्ट अडकल्याने सुमिता यांना असह्य वेदना होत होत्या. अखेर दुपारी दोनच्या सुमारास, म्हणजेच अडीच तासांच्या थरारानंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोषींवर कारवाई करा; पीडितेच्या मदतीची मागणी
पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला आहे. सुदैवाने महिलेचा जीव वाचला. मात्र, त्यांना झालेला त्रास आणि दुखापत गंभीर आहे. संबंधित दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि जखमी महिलेला महापालिकेने योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी महापालिका स्थायी समितीचे सदस्य संतोष कोकणे यांनी आयुक्त आणि स्थायी समितीकडे केली आहे.
Web Summary : A 55-year-old woman was seriously injured in Kalewadi after her leg got stuck in an open water pipe. Firefighters rescued her after a two-and-a-half-hour operation. Negligence from authorities is suspected. Compensation is demanded for the victim.
Web Summary : कालेवाड़ी में एक 55 वर्षीय महिला का पैर पानी के पाइप में फंस गया। दमकल कर्मियों ने ढाई घंटे के बाद उसे सुरक्षित निकाला। अधिकारियों की लापरवाही का संदेह है। पीड़िता के लिए मुआवजे की मांग की गई है।