चिंचवडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद, पवना धरण शंभर टक्के;मावळ, मुळशीत संततधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:34 IST2025-08-19T13:33:49+5:302025-08-19T13:34:31+5:30
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातून नदीमध्ये विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. पावसाचा जोर कायम

चिंचवडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद, पवना धरण शंभर टक्के;मावळ, मुळशीत संततधार
पिंपरी : मावळ, मुळशी आणि खेड परिसरामध्ये गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिंचवडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पवना धरण सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत ९८ टक्के भरले होते. रात्रीत ते शंभर टक्के होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहराच्या पुढील वर्षीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
गेल्या आठवड्यात काही काळ उघडीप दिलेल्या पावसाचे रविवार सायंकाळपासून आगमन झाले. सोमवारी दिवसभर पाऊस पडत होता. सकाळच्या टप्प्यात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. दुपारी तीननंतर पावसाचा जोर कमी झाला होता. सायंकाळी पुन्हा अचानक आलेल्या पावसामुळे नोकरदार वर्गाचे तसेच शालेय विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती. पिंपरी आणि चिंचवडमध्ये दुपारी वीजपुरवठा खंडित झाला होता.
उपनगरातही पाऊस
पिंपरी चिंचवड शहर परिसरातील चिंचवड, निगडी, आकुर्डी, थेरगाव, वाकड, पुनावळे, किवळे, रावेत, सांगवी, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, दापोडी, बोपखेल, मोशी, चऱ्होली, दिघी, चिखली, तळवडे या भागात पाऊस जोरदार पडला. त्यामुळे उपनगरातील रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले होते.
पवना धरणाचा विसर्ग वाढवणार
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातून नदीमध्ये विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे रात्रीत शंभर टक्के धरण भरणार असल्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे मध्यरात्री नंतर विसर्ग वाढवण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाचे मत आहे.
नदीकाठच्या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा
शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. नद्यांमधील विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे शहरातील नदीकाठच्या भागांमधील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या वतीने पूर नियंत्रणासाठी सज्जता ठेवली आहे. तसेच प्रभाग स्तरावर सजग राहण्याचे आदेश देण्यात आले आहे
शहरात सर्वाधिक पाऊस चिंचवडला
मावळातील पवना धरण परिसरामध्ये आज ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर आजपर्यंत मावळात १,९२१ मिमी पाऊस पडला आहे. शहरात सर्वाधिक पाऊस चिंचवडला पडला आहे. त्यानंतर दापोडी आणि मोशीत अधिक पाऊस पडला आहे.
पाऊस (मिमीमध्ये)
चिंचवड : २९
पाषाण : २८. ९
तळेगाव : १९. ३
हवेली : १४. ५
डुडुळगाव : ३. ५
राजगुरूनगर : ३.०