वायसीएम रुग्णालयात नेफ्रोलॉजिस्टतज्ज्ञांची कमतरता;रुग्णांना ससून,खासगी रुग्णालयांचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:43 IST2025-08-16T15:42:30+5:302025-08-16T15:43:20+5:30

- उपचारांसाठी नागरिकांची भटकंती, आर्थिक संकटात वाढ, महिन्याला ४०० रुग्ण घेतात डायलिसिस उपचार

pimpari-chinchwad news Shortage of nephrologists at YCM Hospital; Patients seek help from Sassoon, private hospitals | वायसीएम रुग्णालयात नेफ्रोलॉजिस्टतज्ज्ञांची कमतरता;रुग्णांना ससून,खासगी रुग्णालयांचा आधार

वायसीएम रुग्णालयात नेफ्रोलॉजिस्टतज्ज्ञांची कमतरता;रुग्णांना ससून,खासगी रुग्णालयांचा आधार

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नेफ्रोलॉजी विभाग आहे. तिथे गेल्या दीड वर्षापासून पूर्णवेळ किंवा अर्धवेळ नेफ्रोलॉजिस्ट (किडनीरोगतज्ज्ञ) नाही. यामुळे किडनीच्या आजारांचे निदान आणि उपचारांसाठी रुग्णांना ससून रुग्णालयात जावे लागत आहे. खासगी नेफ्रोलॉजिस्टचे शुल्क सामान्य नागरिकांना परवडणारे नसल्याने गरीब रुग्ण आर्थिक संकटात सापडले आहेत.

नेफ्रोलॉजिस्ट का नाहीत?

वायसीएम प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, खासगी रुग्णालयात नेफ्रोलॉजिस्टना लाखोंच्या पगारासह स्वतःच्या क्लिनिकमधून दररोज हजारो रुपये मिळतात. त्यामुळे महापालिकेच्या तुलनेने कमी मानधनावर काम करण्यास तज्ज्ञ तयार होत नाहीत. गेल्यावर्षी मानधनावर कार्यरत असलेल्या नेफ्रोलॉजिस्टचा कार्यकाळ संपल्यानंतर महापालिकेने नवीन तज्ज्ञाची नियुक्ती केलेली नाही. यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालये किंवा ससून रुग्णालयात जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

नेफ्रोलॉजिस्टची गरज का?

नेफ्रोलॉजिस्ट हे मूत्रपिंडाच्या आजारांचे निदान आणि उपचारासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले तज्ज्ञ असतात. ‘एमबीबीएस’नंतर सुमारे तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतरच नेफ्रोलॉजिस्ट बनता येते. किडनी विकार तात्पुरता आहे की, कायमस्वरूपी, डायलिसिसची किती वेळ गरज आहे, कोणती औषधे द्यावीत, यांसारख्या गोष्टी फक्त नेफ्रोलॉजिस्टच ठरवू शकतात. सामान्य डॉक्टरांना अशा रुग्णांना तज्ज्ञांकडे पाठवण्याशिवाय पर्याय नसतो.

नागरिकांचा संताप

“माझ्या नातेवाइकाला महापालिका रुग्णालयात किडनीला इन्फेक्शन असल्याचे सांगण्यात आले; पण तिथे तज्ज्ञ नसल्याने ससून किंवा खासगी रुग्णालयांत जाण्याचा सल्ला मिळाला. महापालिकेच्या रुग्णालयात तरी एक नेफ्रोलॉजिस्ट असायला हवा,” अशी खंत एका रुग्णाच्या नातेवाइकाने व्यक्त केली. काही नागरिकांनी तर परदेशातून नेफ्रोलॉजिस्ट आणण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे शासनाच्या या अपयशावर प्रकाश पडतो.

उपाययोजना काय?

महापालिकेने तातडीने नेफ्रोलॉजिस्टची नियुक्ती करावी, आवश्यकता असल्यास आकर्षक मानधन द्यावे. खासगी नेफ्रोलॉजिस्टना कमी खर्चात उपचार देण्यासाठी महापालिकेशी करार केल्यासही वायसीएम रुग्णालयात नेफ्रोलॉजिस्ट उपलब्ध होऊ शकतात.

आकडे काय सांगतात?

भारतात दरवर्षी सुमारे २.२ लाख नवीन किडनी रुग्ण आढळतात (इंडियन जर्नल ऑफ नेफ्रोलॉजी, २०२३). पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे १० दहा हजार रुग्ण किडनी आजाराने ग्रस्त असल्याचा अंदाज आहे. ‘वायसीएम’मध्ये महिन्याला साधारणपणे ३०० ते ४०० रुग्ण डायलिसिस घेतात. खासगी रुग्णालयात नेफ्रोलॉजिस्टचा सल्ला शुल्क १,००० ते ३,००० रुपये प्रतिभेट आहे. तर डायलिसिसचा खासगी खर्च २,५०० ते ५,००० रुपये प्रतिसत्र आहे.

वायसीएम रुग्णालयात नेफ्रोलॉजिस्टची कमतरता ही केवळ प्रशासकीय अपयश नसून सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे. यावर तत्काळ उपाययोजना न झाल्यास रुग्णांचे हाल वाढण्याची भीती आहे.

‘वायसीएम’मध्ये कायस्वरूपी नेफ्रोलॉजिस्ट नियुक्ती करण्यासाठी महापालिका प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्था 

Web Title: pimpari-chinchwad news Shortage of nephrologists at YCM Hospital; Patients seek help from Sassoon, private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.