अखेर शहरातील १५ आरएमसी प्रकल्प सील;महापालिकेच्या शोधपथकाकडून २२ प्रकल्पांची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 16:18 IST2026-04-23T16:12:22+5:302026-04-23T16:18:38+5:30
- नियमभंग केल्याने कारवाई; धूळ नियंत्रणासाठी यंत्रणांचा अभाव, पाण्याची फवारणी न करणे, पर्यावरणीय नियमांकडे दुर्लक्ष करणे भोवले

अखेर शहरातील १५ आरएमसी प्रकल्प सील;महापालिकेच्या शोधपथकाकडून २२ प्रकल्पांची तपासणी
पिंपरी : शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने अखेर कडक भूमिका घेत रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांवर धडक कारवाई केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने लक्ष वेधत ‘शहरातील आरएमसी प्रकल्पांवर कारवाई होणार का’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जाग आलेल्या महापालिकेच्या पर्यावरण विभागाने एकूण २२ प्रकल्पांची तपासणी करत नियमभंग करणारे १५ प्रकल्प सील केले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १७ ऑक्टोबर २०२५ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरातील २२ आरएमसी प्रकल्पांवर उपद्रव शोधपथकांनी सखोल पाहणी केली. तपासणीत धूळ नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणांचा अभाव, परिसरात पाण्याची फवारणी न करणे, उघड्यावर साहित्य साठवणे, तसेच पर्यावरणीय नियमांकडे दुर्लक्ष केल्याच्या गंभीर बाबी समोर आल्या. परिणामी, अशा १५ प्रकल्पांवर तत्काळ सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली.
उर्वरित प्रकल्पांनाही महापालिकेने इशारा दिला आहे. हवा गुणवत्ता निरीक्षण प्रणाली बसविणे, प्रकल्पाभोवती शेड्स उभारणे, नियमित पाण्याची फवारणी करणे आणि धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. शहरात बांधकाम आणि औद्योगिक प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या धूळकणांमुळे वायू प्रदूषणात मोठी भर पडत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने महापालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे.
या आरएमसी प्रकल्पांवर केली महापालिकेने कारवाई...
१. वेलकॉन आरएमसी, भीमनगर, मोशी
२. ओम डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, रावेत
३. पी.आर. इन्फ्राटेक, पवारवस्ती, ताथवडे
४. डीएमआर बिल्डर्स प्रा. लि. (एनएचएझ प्रोजेक्ट), पवार वस्ती, ताथवडे
५. क्लिनर्जी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आदर्शनगर, मोशी
६. ए अँड ए इन्फ्रा प्रा. लि./ वाघेश्वर आरएमसी प्लांट, मोशी
७. मोहनलाल मथराणी प्रायव्हेट लिमिटेड (आरएमसी प्लांट), मोशी
८. ग्रे स्टोन आरएमसी प्लांट, सीएनजी-पेट्रोल पंपाच्या मागे, पिंपळे निलख
९. श्वेता आरएमसी प्लांट (मार्लिन ग्रुप), वाकड
१०. एम इन्फ्रा आरएमसी प्लांट, ताजणे वस्ती, पुनावळे
११. एम कॉर्न आरएमसी प्लांट, काटे वस्ती, पुनावळे
१२. जे. कुमार आरएमसी प्लांट, जुना देहू-आळंदी रोड, भीमनगर, पिंपरी
१३. शिवांश कन्स्ट्रक्शन (आरएमसी प्लांट), चऱ्होली
१४. नागेश्वर इन्फ्रा आरएमसी प्लांट, डुडुळगाव
१५) भाटे अँड राजे आरएमसी प्लांट, तापकीर मळा, रहाटणी
शहरातील आरएमसी प्लांट्स आणि बांधकाम प्रकल्पांनी बांधकाम ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे अनिवार्य आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता तात्काळ कारवाई केली जात आहे. पुढील काळातही अशी तपासणी मोहीम राबवून प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक नियंत्रण ठेवण्यात येईल. - संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका