जुलाब, उलट्यांमुळे नागरिक झाले बेजार; पण पाणी शुद्ध असल्याचा महापालिकेचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 14:23 IST2025-04-22T14:22:01+5:302025-04-22T14:23:46+5:30
- रावेत, मोशी, वाल्हेकरवाडी, जाधववाडी, चऱ्होली आदी भागांत दूषित पाणीपुरवठा;नागरिकांची दवाखान्यांमध्ये गर्दी

जुलाब, उलट्यांमुळे नागरिक झाले बेजार; पण पाणी शुद्ध असल्याचा महापालिकेचा टाहो
पिंपरी : शहरातील विविध भागांत मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणी दूषित व दुर्गंधीयुक्त येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जुलाब, उलट्या आणि सर्दीमुळे पिंपरी-चिंचवडकर बेजार आहेत. दवाखाने रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत, तरी पाणी शुद्ध असल्याबाबतचा निर्वाळा खास प्रसिद्धीपत्रकाद्वारे महापालिकेने दिला आहे.
शहरातील रावेत, मोशी, वाल्हेकरवाडी, जाधववाडी, चऱ्होली आदी भागांत दूषित पाणीपुरवठा होत असूनही महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करीत असून, नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत. सध्या पावसाळा सुरू नाही. गढूळ पाणी येण्याचा काहीच संबंध नाही. मात्र पाणी पिवळसर दिसत असून, त्याला उग्र दर्प येत आहे. हे पाणी पिण्याचे आहे की ड्रेनेजमिश्रित पाणीपुरवठा महापालिकेकडून करण्यात येत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
जलवाहिन्यांची चाळणी आणि असुरक्षित पाणी साठवण
जलवाहिन्यांची काही ठिकाणी चाळण झाली आहे. असुरक्षित पाणी साठवण टाक्क्यांमुळे पाणी दूषित येते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी दवाखान्यांमध्ये संबंधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले.
महापालिकेच्या अहवालात पाणी पिण्यायोग्यच.....
मागील काही दिवसांत शहरातील समाविष्ट गावांमध्ये अचानक गॅस्ट्रोचे पेशंट वाढले. त्यामुळे महापालिकेने तातडीने सर्व गाव विभागाला पाणीपुरवठा होत असलेल्या शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी नमुने महापालिकेच्या निगडी येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर फिल्टर प्लांटपासून पाणी पुढे सोडल्यानंतर नेमके पुढे कुठे जाऊन पाणी खराब होत आहे काय? याबाबत तपासणी करण्यासाठी गाव भागातील अनेक ठिकाणी प्रत्यक्ष नळतोटीच्या पाण्याचे नमुने घेण्यात येऊन तेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात आले. त्यातील ९० टक्के अहवालानुसार पाणी पिण्यायोग्य असल्याचे निष्कर्ष आले; काही भागातील पाणीपुरवठा खराब झाल्याचा निष्कर्ष आला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच भागातील पाणी नमुने पिण्यायोग्य असल्याचा अहवाल आला. ही समस्या नेमक्या कोणत्या कारणामुळे उद्भवत आहे, याबाबत ठोस उत्तरे महापालिका देऊ शकत नाही.
सद्य:स्थितीत जुलाब, उलटीचे रुग्ण अधिक आहेत. हे आजार दूषित पाण्यामुळे होत आहेत. तसेच सध्या ऊन वाढले आहे. त्याचाही अधिक जणांना त्रास होत आहे. पाणी उकळून पिणे तसेच उन्हात जास्त न फिरणे यावर उपाय आहेत. - डॉ. विक्रम महाडिक, वाल्हेकरवाडी
गेल्या दोन तीन दिवसांपासून जुलाब, उलटी, पोटदुखीचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे दूषित पाणी असू शकते. तसेच उन्हामुळे नागरिक सध्या थंड पदार्थ खात आहेत. त्यामुळे त्रास होत असावा. - डॉ. उमेश चौधरी, मोशी
महापालिकेच्या वतीने ज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागांतील पाणी नमुने तपासणी करणे, एखाद्या ठिकाणी जलवाहिनी फुटून अशुद्ध पाणी पाइपलाइनमध्ये जात आहे? काय याचा शोध घेणे, जलवाहिनीची दुरुस्ती करणे, याबाबी केल्या जात आहेत. अन्य काही कारणांमुळे ही समस्या उद्भवली आहे काय? याचाही शोध घेतला जात आहे. सद्यःस्थितीत नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे. अन्य काही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये. - प्रमोद ओंबासे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका