‘आज पैसे दिले नाही तर जिवंत सोडणार नाही', पिंपरीत तरुणाची चाकू भोसकून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:53 IST2026-02-27T13:53:22+5:302026-02-27T13:53:54+5:30
दोन भाऊ घरी जात असताना त्यांना अडवून जुन्या पैशांच्या व्यवहारावरून संशयितांनी वाद घातला

‘आज पैसे दिले नाही तर जिवंत सोडणार नाही', पिंपरीत तरुणाची चाकू भोसकून हत्या
पिंपरी : पैशांच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. २४ फेब्रुवारी) रात्री अकराच्या सुमारास काळेवाडीतील लकी बेकरी चौकात घडली.
हाशिम सईद राईन (वय २४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अरबाज सईद राईन (वय २२, रा. विजयनगर, काळेवाडी, मूळ रा. गौरा चौकी, ता. मनकापूर, जि. गौडा, उत्तरप्रदेश) यांनी या प्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सद्दाम मुमताज राईन (वय ३४, रा. कापसे चाळ, विजयनगर, काळेवाडी) आणि शरीफ वली खान ऊर्फ जर्सी पठाण (वय ३०, रा. कापसे चाळ, विजयनगर, काळेवाडी) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरबाज व त्यांचा चुलत भाऊ हाशिम राईन हे जेवण करून घरी जात असताना संशयितांनी त्यांना अडवले. जुन्या पैशांच्या व्यवहारावरून संशयितांनी ‘‘आज पैसे दिले नाही तर याला जिवंत सोडणार नाही’’ असे म्हणत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, संशयिताने चाकू काढून फिर्यादीच्या डोळ्यावर वार केला. भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या हाशिम यांच्या छातीत संशयिताने चाकू खुपसल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक बालाजी मेटे तपास करीत आहेत.