पिंपरी : दहावीच्या परीक्षेत मित्रांना जादा टक्के गुण मिळाले. मात्र आपल्याला केवळ ७५ टक्के गुण मिळाल्याने दहावीतील एका विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली. चिंचवड येथे वाल्हेकरवाडीमध्ये गुरुवारी (दि. १५) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
उमंग रमेश लोंढे (१६, रा. शिवले कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंकुश बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमंग याचे वडील खासगी कंपनीत कामाला आहेत. तसेच आई देखील नोकरी करते. चिंचवड येथील शाळेतून उमंग याने दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. उमंग याच्या इतर मित्रांना ८० ते ९० टक्के गुण मिळाले. मात्र आपल्याला केवळ ७५ टक्के गुण मिळाल्याने उमंग याला नैराश्य आले होते.
गुरुवारी सकाळी उमंग याच्या आईला कामावर सोडण्यासाठी त्याचे वडील गेले होते. त्यावेळी राहत्या घरात उमंग याने ओढणीच्या सहायाने गळफास घेतला. वडील घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. उमंग याला त्वरित पिंपरी येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.