१० दिवस होऊनही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत; पीएमपीएलएम उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 09:32 IST2025-08-22T09:31:54+5:302025-08-22T09:32:08+5:30
पहाटे ५ वाजल्यापासून सुमारे ४०पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने बस सेवा मंदावली

१० दिवस होऊनही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत; पीएमपीएलएम उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
निगडी: वेळोवेळी मागणी करूनही वेतन वाढ मिळत नसल्यामुळे निगडी आगारातील पीएमपीएलएम उपक्रमातील इलेक्ट्रिक बस वरील कंत्राटी बसचालकांनी शुक्रवारी असहकाराची भूमिका घेत काम बंद आंदोलन केले. कंत्राटदार आणि कंत्राटी कर्मचारी त्यांच्यातील वाद विकोप्याला गेल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद करून आंदोलन पुकारले. परिणामी, या दोघांच्या वादाचा प्रवाशांना फटका बसला. बस सेवेवर मर्यादा येत असल्याने, पीएमपीएल प्रवासी वर्गात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
निगडी आगारातील ट्रॅव्हल टाईम मोबाइलीटी सर्व्हिसेस या ठेकेदाराच्या इलेक्ट्रिक बसवरील चालकांनी शुक्रवारी पहाटे पासून वेतन वाढ तसेच विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केले. पहाटे ५ वाजल्यापासून सुमारे ४०पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने बस सेवा मंदावली. त्यामुळे सकाळच्या सुमारास निगडीतील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बस टर्मिनल येथून जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अनेकांनी जादा पैसे मोजून पर्यायी वाहतूक सेवेचा वापर केला. तर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीएलएमच्या बस चालकांच्या मदतीने काही बस मार्गाचे प्रवर्तन करण्यात आले.
आम्ही अनेक वर्ष्यापासून पीएमपीएलएमच्या इलेक्ट्रिक बस चालवत आहे. मात्र ठेकेदाराकडून मिळणारे वेतन कमी आहे. यामुळे आमच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह होत नाही. ११ ऑगस्ट रोजी मागणीचे निवेदन दिले होते. पाच दिवसात सर्व मागण्यांची अंमलबजावणी करू असेल आश्वासन दिले होते. मात्र दहा दिवस होऊनही आमच्या मागण्या मान्य केल्या नसल्याने आम्ही आज पासून काम बंद आंदोलन करत आहोत. - कंत्राटी बस चालक