पिंपरी : पुणे ग्रामीण पोलिस दलातील गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेली श्वान दुर्गा आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. दुर्गा श्वान २०१६ मध्ये पोलिस दलात रुजू झाले. तेव्हापासून अविरत सेवा देणाऱ्या या श्वानाने वासाच्या आधारे अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावून पोलिस तपासात मोलाची भर घातली आहे.
श्वान दुर्गाची देखरेख पोलिस हवालदार अशोक लोखंडे तसेच पोलिस शिपाई सागर रोकडे हे दोन प्रशिक्षित पोलिस अंमलदार करतात. पहाटेचा सराव, त्यानंतर ग्रुमिंग व जेवण, सायंकाळी पुन्हा सराव, ग्रुमिंग आणि जेवण असा शिस्तबद्ध दिनक्रम दुर्गा काटेकोरपणे पाळते. अंडी हे तिचे आवडते खाद्य आहे. विशेष म्हणजे, इतक्या वर्षांच्या सेवेत दुर्गा कधीही आजारी पडलेली नाही.
सेवाकाळात दुर्गाने मंचर, इंदापूर, शिक्रापूर, आळेफाटा, शिरूर, सासवड, माळेगाव आदी अनेक पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात निर्णायक भूमिका बजावली. इंदापूर येथे संशयिताच्या टीशर्टच्या वासावरून हत्यार व घर शोधणे, शिक्रापूर येथील रुग्णालयातून पळून गेलेल्या संशयिताचा चादरीच्या वासावरून शोध, आळेफाट्यावरील खुनाचा तपास, विहिरीत लपवलेला मृतदेह शोधून काढणे, तसेच मंचर तालुक्यात तब्बल अडीच किलोमीटरपर्यंत निरगुडसर ते पारगाव शिवेपर्यंत माग काढणे ही तिच्या कार्यक्षमतेची ठळक उदाहरणे आहेत.
अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या गुन्ह्यांतही दुर्गाने पोलिसांना यश मिळवून दिले. पौड-नांदे येथील चारित्र्याच्या संशयातून झालेल्या खुनात हत्यारांच्या वासावरून संशयित निष्पन्न करणे, मंचर येथे चपलेच्या वासावरून संशयिताची ओळख पटवणे, मावळ तालुक्यातील कोथुर्णे-कामशेत येथील सात वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व खून प्रकरणात चपलेच्या वासावरून संशयिताचे घर आणि संशयित शोधणे, तसेच ३ फेब्रुवारी २०२६ रोजी लोणावळा ग्रामीण हद्दीत बेपत्ता असलेल्या श्रेया पती (रा. बदलापूर, मुंबई) हिच्या रुमालाच्या वासावरून मृतदेहाचा शोध घेणे, ही कामगिरी आजही थरकाप उडवणारी आहे.
कोल्हापूर येथे झालेल्या पोलिस कर्तव्य मेळाव्यात उतारवयातही दुर्गाने पुणे ग्रामीण पोलिस दलास द्वितीय क्रमांक मिळवून दिला आणि जणू ‘अभि तो मैं जवान हूँ’ असेच सिद्ध केले. तिच्या मदतीने अनेक गुन्ह्यांतील गुन्हेगारांना जन्मठेप, तर काहींना फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. अशा या निष्ठावान, कर्तव्यदक्ष आणि पोलिस दलाची शान असलेली श्वान दुर्गा २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त होणार आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या इतिहासात तिचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल, असा विश्वास पोलिस अंमलदार सागर रोकडे यांनी व्यक्त केला.
वेळोवेळी काैतुक, सन्मान
श्वान दुर्गाच्या कार्याची दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वेळोवेळी घेतली. कौतुक तसेच विविध पदक प्रदान करून दुर्गाचा वेळोवेळी सन्मान करण्यात आला आहे. पुणे ग्रामीचे तत्कालीन सर्व अधीक्षक आणि विद्यमान अधीक्षक संदीपसिंह गिल यांनीही दुर्गाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
Web Summary : Police dog Durga, retiring after years of solving serious crimes in Pune, used her keen sense of smell to assist investigations. Her dedication earned her accolades and helped secure convictions for numerous criminals. She is known for her loyalty and efficiency.
Web Summary : पुणे में गंभीर अपराधों को सुलझाने के बाद पुलिस कुतिया दुर्गा सेवानिवृत्त हो रही है। अपनी तीव्र गंध से जांच में सहायता की। समर्पण के लिए प्रशंसा मिली और कई अपराधियों को सजा दिलाने में मदद की। वह अपनी वफादारी और दक्षता के लिए जानी जाती है।