Chinchwad By Election | "राष्ट्रवादीवर आरोप करण्यापूर्वी फडणवीसांनी आत्मचिंतन करावे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 20:48 IST2023-02-24T20:47:09+5:302023-02-24T20:48:57+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आत्मचिंतन करावे, असा पलटवार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केला...

Chinchwad By Election | "राष्ट्रवादीवर आरोप करण्यापूर्वी फडणवीसांनी आत्मचिंतन करावे"
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेना संपवली, असा आरोप देवेंद्र फडणवीस करत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे हे स्वत: मान्य करतात की, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसने चांगली साथ दिली, तर २५ वर्षे आमची भाजपसोबत युतीमध्ये शिवसेना सडली, असे ठाकरे स्वत: मान्य करतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आत्मचिंतन करावे, असा पलटवार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केला.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता संपला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पवार म्हणाले, आताच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. यावरून जनतेमध्ये तीव्र संताप आहे. त्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, तर जनता जनार्दनांच्या न्यायलयातही त्याचा निर्णय होणार आहे. केंद्रीय तपासयंत्रणांना हाताशी धरून मुस्कटदाबी सुरू आहे, त्याला जनता चोख उत्तर दिले जाईल, असे पवार यांनी सांगितले.
त्या बॅनरला काडीची किंमत...
शास्तीकराबाबत पवार म्हणाले, २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. २०१७ ते २०१९ मुख्यमंत्री असताना त्यांची महापालिकेतही सत्ता होती. त्यावेळी त्यांना शास्तीकराचा प्रश्न सोडविता आला नाही. त्यामुळे निवडणुका आल्या की, ते सोयीचे राजकारण करतात. दरम्यान, राष्ट्रवादीतील अजित पवार, सुप्रिया सुळे व जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले होते, त्याबाबत विचारले. त्यावेळी पवार म्हणाले, ज्यांच्याकडे बहुमत असते, त्यांचा मुख्यमंत्री होतो. बहुमत असल्याशिवाय या चर्चेला काही किंमत नाही. त्यामुळे माझ्या लेखी त्या बॅनरला काडीचीही किंमत नसल्याचे पवार यांनी सांगितले.
कावळ्याचा शापाने....
सांगवी येथील सभेमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीला माझा शाप असल्याचे कवितेमधून सांगितले. त्यावर बोलताना पवार म्हणाले, चिंचवडमध्ये भाजपच्या विरोधात उमेदवार देऊ नका, असा आठवले यांचा फोन मला आला नाही. त्यांनी शाप देऊन काही होत नाही, कारण कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत, तसेच त्यांना गांभीर्याने घेण्याची गरजही नसल्याचा टोला पवार यांनी लगावला.