शेतमजुरी, वेटरचे काम, कुल्फी विक्री करत वृतपत्र विक्रेता बनला साहेब! ८ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश मिळालं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:44 IST2026-01-10T13:43:53+5:302026-01-10T13:44:41+5:30
भविष्यात पुन्हा एमपीएससीद्वारे उपजिल्हाधिकारी किंवा पोलिस उपअधीक्षक होण्यासाठी प्रयत्न करणार

शेतमजुरी, वेटरचे काम, कुल्फी विक्री करत वृतपत्र विक्रेता बनला साहेब! ८ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश मिळालं
पिंपरी : शेतात मजुरी, हॉटेलमध्ये वेटरचे काम, कुल्फी विक्री आणि घरोघरी वर्तमानपत्रं वाटपाचे काम करून शिक्षणाचा खर्च भागवणारा गरीब कुटुंबातील रवींद्र चव्हाण या तरुणाने यूपीएससी परीक्षेत यश मिळवून अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. ही यशोगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
मोशी येथे वास्तव्यास असलेल्या आणि मूळच्या तारखेडे (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील रवींद्रची यूपीएससीद्वारे भविष्य निर्वाह निधी संघटन (ईपीएफओ) मध्ये प्रवर्तन अधिकारी-लेखा अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तारखेडे येथे झाले. दहावीत तो शाळेत पहिला आला. आई-वडील शेतमजूर म्हणून त्यालाही शेतात काम करावे लागले. सातवीत त्याने हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले, कुल्फी विकली आणि पुढे अभियांत्रिकी शिक्षण घेताना घरोघरी वर्तमानपत्रे वाटून शिक्षणाचा खर्च भागवला.
जळगाव येथे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने चार वर्षे खासगी कंपनीत नोकरी केली. त्याचवेळी पुण्यातून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. चारवेळा यूपीएससी मुख्य परीक्षा, एकदा एमपीएससी मुख्य परीक्षा तसेच फौजदार पदाची मुलाखतही दिली. अखेर सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्याने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. यागे सोहम सार्वजनिक अभ्यासिकेतील शांत वातावरण व समृद्ध ग्रंथसंपदा मोलाची ठरल्याचे त्याने सांगितले.
सोहम सार्वजनिक ग्रंथालयात संत तुकारामनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोरख कुंभार व अतुल शेटे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर उपस्थित होते.
आई-वडील, भाऊ योगेश व वहिनी पूनम यांच्या पाठबळामुळे यश मिळवता आले. यासाठी आठ वर्ष संघर्ष करावा लागला. भविष्यात पुन्हा एमपीएससीद्वारे उपजिल्हाधिकारी किंवा पोलिस उपअधीक्षक होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - रवींद्र चव्हाण