Travel : शाहरुख खानच्या गाण्यांमध्ये दिसणारे स्वित्झर्लंडमधील 'ते' ठिकाण नक्की कुठे आहे? कसे जाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:23 IST2026-01-08T15:18:17+5:302026-01-08T15:23:26+5:30

स्वित्झर्लंड म्हणजे केवळ बर्फाच्छादित डोंगररांगा नव्हे, तर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मधील राज आणि सिमरनचा रोमान्स आहे.

स्वित्झर्लंडची सफर करणे हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते. पण तुम्हाला माहित आहे का? भारतीयांसाठी स्वित्झर्लंड म्हणजे केवळ बर्फाच्छादित डोंगररांगा नव्हे, तर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मधील राज आणि सिमरनचा रोमान्स आहे.

म्हणूनच स्वित्झर्लंडला जाणारा प्रत्येक भारतीय 'माउंट टिटलिस' या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतो. समुद्रसपाटीपासून ३२३८ मीटर उंचीवर असलेल्या या डोंगरावर आजही शाहरुख खान आणि काजोल यांची जादू पाहायला मिळते.

टिटलिस व्हॅलीमध्ये पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे शाहरुख खान आणि काजोल यांचे लाइफ-साईज कटआउट्स. 'डीडीलजे' चित्रपटातील त्यांच्या प्रसिद्ध पेहरावात हे कटआउट्स लावण्यात आले आहेत. बॉलिवूड प्रेमी येथे आवर्जून थांबून राज आणि सिमरनसोबत फोटो काढतात. यानंतर पर्यटक 'टिटलिस क्लिफ वॉक'चा आनंद घेतात आणि येथील रहस्यमय 'ग्लेशियर केव्ह' पाहण्यासाठी जातात.

कसं पोहोचायचं या स्वप्न नगरीत? : शाहरुख-काजोलच्या या फ्रोजन अवताराला भेट देण्यासाठी तुम्हाला मध्य स्वित्झर्लंडमधील 'एंजलबर्ग' या छोट्याशा पण सुंदर गावात जावे लागेल. यासाठी ल्यूसर्न शहरातून 'ल्यूसर्न-एंजलबर्ग एक्सप्रेस' पकडा. अवघ्या ४५ मिनिटांत तुम्ही या निसर्गरम्य गावात पोहोचता.

एंजलबर्गमध्ये अनेक आलिशान हॉटेल्स उपलब्ध आहेत, जिथे तुम्ही मुक्काम करू शकता. टिटलिस व्हॅलीचे सौंदर्य डोळ्यांत साठवण्यासाठी केबल कार हा सर्वोत्तम पर्याय आहे. डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी दिवसभर केबल कारची सुविधा असते.

मात्र, हवामान खराब असल्यास किंवा जोराचा वारा सुटल्यास ही सेवा तात्पुरती बंद ठेवली जाते. त्यामुळे पर्यटकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच जाणे सोयीचे ठरते.

'एंजलबर्ग' नावामागची रंजक गोष्ट एंजलबर्गमध्ये केवळ बर्फच नाही, तर ऐतिहासिक वारसाही आहे. येथे १२ व्या शतकातील (११२० ईसवी) एक प्रसिद्ध बेनेडिक्टिन मठ आहे. आजही येथे भिक्षूंचे वास्तव्य आहे. हे स्वित्झर्लंडमधील सर्वात मोठे मॉन्स्ट्री चर्च मानले जाते.

या मठानेच या गावाला 'एंजलबर्ग' हे नाव दिले, ज्याचा अर्थ 'फरिश्त्यांचा आवाज' असा होतो. जर तुम्हीही स्वित्झर्लंडला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर राज-सिमरनच्या या जादुई दुनियेला भेट द्यायला विसरू नका!