समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:20 IST2026-01-02T12:54:32+5:302026-01-02T13:20:27+5:30

२०२६ च्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये तुम्ही अशा काही 'हिडन बीच'चा समावेश करू शकता, जिथे तुम्हाला केवळ शांतता आणि आत्मिक समाधान मिळेल.

नव्या वर्षात फिरायला जायचं म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे गोव्याचे गर्दीने फुललेले समुद्रकिनारे, मोठमोठ्या आवाजातलं संगीत आणि पर्यटकांची लगबग. पण तुम्हाला जर खरोखरच निसर्गाच्या सानिध्यात, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत निवांत वेळ घालवायचा असेल, तर या प्रसिद्ध ठिकाणांच्या पलीकडेही भारताकडे बरंच काही आहे.

२०२६ च्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये तुम्ही अशा काही 'हिडन बीच'चा समावेश करू शकता, जिथे तुम्हाला केवळ शांतता आणि आत्मिक समाधान मिळेल.

पेरूमथुरा बीच, केरळ: नारळाच्या राया आणि अथांग सागर थिरुवनंतपुरम जवळ असलेला हा बीच नारळाच्या झाडांनी वेढलेला आहे. लांबवर पसरलेली वाळू आणि मासेमारांच्या बोटी, असं साधं पण सुंदर चित्र इथे पाहायला मिळतं. इथे कोणतीही व्यावसायिक धावपळ नाही. लाटांची संत गती आणि मोकळं वातावरण तुम्हाला आयुष्यातील ताणतणाव विसरायला लावेल.

ओम बीच, कर्नाटक: साधेपणा आणि ठहराव गोकर्ण जवळ असलेला 'ओम बीच' त्याच्या 'ॐ' या आकारामुळे प्रसिद्ध आहे. सकाळी जेव्हा सूर्यकिरणं इथल्या खडकांवर पडतात, तेव्हाचं दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणारं असतं. इथे येणारे पर्यटकही शांतताप्रिय असतात. कोणतीही घाई न करता, फक्त समुद्राकडे बघत चहाचे घोट घेणं ही इथली सर्वात मोठी चैन आहे.

मिनिकॉय बीच, लक्षद्वीप: निवांतपणाची व्याख्या लक्षद्वीपमधील मिनिकॉय बीचवर पोहोचणं थोडं कठीण आहे, पण तिथे गेल्यावर होणारा आनंद शब्दांत मांडता येणार नाही. पांढरी शुभ्र वाळू आणि निळेशार पाणी हे इथलं वैशिष्ट्य. इथे स्थानिक लोकही खूप शांत आयुष्य जगतात. एखादं पुस्तक वाचत तासनतास वाळूवर बसून राहण्यासाठी यापेक्षा चांगली जागा शोधूनही सापडणार नाही.

चांदीपूर बीच, ओडिशा: समुद्राची जादू ओडिशामधील चांदीपूर बीच पर्यटकांना थक्क करून सोडतो. ओहोटीच्या वेळी इथला समुद्र चक्क ५ किलोमीटर मागे सरकतो. त्यामुळे उघड्या पडलेल्या वाळूच्या विस्तीर्ण भागावर चालताना तुम्ही एका वेगळ्याच जगात आल्याचा भास होतो. इथे ना दुकानांचा गोंधळ आहे ना कसला आवाज. शांतपणे चालत राहणे आणि निसर्गाची ही किमया पाहणे हा एक अद्भूत अनुभव असतो.

बटरफ्लाय बीच, गोवा: निसर्गाचं गुपित गोव्यात असूनही गर्दीपासून मैलोन्मैल दूर असलेलं हे ठिकाण म्हणजे 'बटरफ्लाय बीच'. इथे जाण्यासाठी तुम्हाला हिरव्यागार रानातून ट्रेकिंग करावं लागतं किंवा पालोलेम बीचवरून बोटीने जावं लागतं. एका छोट्याशा खाडीसारखा दिसणारा हा बीच इतका शांत आहे की, इथे तुम्हाला फक्त लाटांचा आवाज ऐकू येईल. स्वतःला वेळ देण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.