Mahashivratri : हर हर महादेव! महाशिवरात्रीला 'या' शंकराच्या मंदिरांना नक्की द्या भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 04:56 PM2020-02-20T16:56:55+5:302020-02-20T17:24:30+5:30

महाशिवरात्रीला महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. अनेकांचा उपवास या दिवशी असतो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्हाला जर महादेवाच्या मंदिरात जायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला महादेवाचे मंदिर कुठे आहेत. याबदद्ल सांगणार आहोत.

धुतपापेश्वर मंदिर- कोकणातील राजापूर हे निसर्गाने नटलेलं गाव. याच राजापूर बसस्थानकापासून साधारणतः 3-4 किमी अंतरावर घनदाट वनराईमध्ये मृडानी नदीच्या लहानमोठ्या धबधब्यांमध्ये वसलेलं धुतपापेश्वर मंदिर आहे. राजापूर बसस्थानकावरून बसने तुम्ही या मंदिरात जाऊ शकता.

अंबरनाथचे शिवमंदिर - अंबरनाथ हे एक प्राचीन शिवकालीन मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर शिलाहार छित्तराज याने इ. स. 1020 मध्ये बांधण्यासाठी सुरुवात केली आणि त्यानंतर या मंदिराची रचना त्याचा मुलगा मृण्मणिराजाच्या काळात पूर्ण झाली ती 1060 मध्ये. ही सगळी नोंद इतिहासात आढळते. हे मंदिर बांधण्यासाठी पूर्ण 40 वर्षे लागली. अंबरनाथ स्टेशनपासून अगदी पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे.

कोपेश्वर मंदिर- या महादेवाचं नाव कोपेश्वर असून दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहामुळे कोपलेला हा महादेव होय. या मंदिराच्या गर्भगृहामध्ये दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर आणि त्याहून थोडा उंच हा धोपेश्वर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मंदिरात इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. नंदी नसलेले हे दुर्मिळ मंदिर आहे. खिद्रापूर येथे हे मंदिर आहे. कोल्हापूर वरून एसटी ने तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.

बाबुळनाथ मंदिर- गिरगाव चौपाटीजवळ असणाऱ्या एका लहानशा टेकडीवर हे मंदिर प्रस्थापित करण्यात आलेलं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तुम्ही ट्रेनने सुद्धा या ठिकाणी पोहोचू शकता.

तिळसेश्वर- वाडा या पालघर जिल्ह्यातील तालुक्यात तिळसेश्वराचे मंदिर आहे. महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरत असून लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घ्यायला येतात. अनके भक्तगण या ठिकाणी देवाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात.