वेळेपूर्वीच तुम्हाला म्हातारा करतोय तुमचा स्मार्टफोन, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 15:36 IST2025-08-28T15:31:08+5:302025-08-28T15:36:42+5:30

स्मार्टफोनच्या अतिवापराचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

आजच्या डिजिटल युगात जवळजवळ प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. मात्र, याचा अतिवापर केला जातोय. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत...प्रत्येकजण दिवसातून अनेक तास स्मार्टफोनसोबत चिकटून राहतोय.

स्मार्टफोनच्या अतिवापराने डोळ्यांचे आजार, स्मृतीतीभ्रंशसारखे आजार होण्याचा धोका तर आहेच, शिवाय यामुळे तुमचे वय वेगाने वाढत आहे. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, स्मार्टफोनच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश व्यक्तीला त्याच्या वयाच्या आधी वृद्ध बनवू शकतो. यामुळे त्वचेशी संबंधित इतर अनेक समस्यादेखील उद्भवू शकतात.

संशोधनात असे आढळून आले आहे की, स्मार्टफोनसह इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश त्वचेच्या पेशींमध्ये बदल घडवून आणतो. यामुळे पेशी आकुंचन पावण्याचा आणि शेवटी नष्ट होण्याचा धोका आहे. यामुळे त्वचेची चमक कमी होते आणि ती वेळेपूर्वी वृद्ध दिसू लागते.

तज्ञांचे म्हणणे आहे की, निळा प्रकाश त्वचेत खोलवर जातो, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होते. निळ्या प्रकाशामुळे टॅनिंग, हायपरपिग्मेंटेशन, फ्रिकल्स आणि त्वचेशी संबंधित इतर समस्यादेखील उद्भवू लागतात.

निळा प्रकाश जितका जास्त त्वचेच्या संपर्कात येईल, तितके जास्त नुकसान होईल. स्मार्टफोन किंवा इतर गॅझेट्सच्या निळ्या प्रकाशाच्या सतत संपर्कात राहिल्याने त्वचेवर जळजळ होण्याची भीती देखील असते.

स्मार्टफोन आणि इतर स्क्रीन गॅझेट्सचा वापर कमी करून हे नुकसान टाळता येते. तरीही, काही लोकांना त्यांच्या कामामुळे सतत स्क्रीनसमोर बसावे लागते. असे लोक व्हिटॅमिन सी आणि ईची मदत घेऊ शकतात, जे त्वचा तरुण ठेवतात.