WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:08 IST2025-10-09T14:58:57+5:302025-10-09T15:08:22+5:30
अशा वेळी घाबरून न जाता वेळेवर योग्य पाऊले उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून मोठे नुकसान होण्यापूर्वी तुम्ही स्वतःला सुरक्षित करू शकाल.

तुमचं WhatsApp हॅक झाल्याचं कळलं तर काय कराल? अनेकदा सकाळी-सकाळी व्हॉट्सअॅप उघडल्यावर तुम्हाला असे मेसेज दिसतात जे तुम्ही पाठवलेच नाहीत. याचा स्पष्ट अर्थ आहे की, तुमचे अकाउंट हॅकर्सच्या ताब्यात गेले आहे. अशा वेळी घाबरून न जाता वेळेवर योग्य पाऊले उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून मोठे नुकसान होण्यापूर्वी तुम्ही स्वतःला सुरक्षित करू शकाल.
सर्वात पहिले काम म्हणजे, तुमच्या सर्व कॉन्टॅक्ट्सना त्वरित सांगा की, तुमचे अकाउंट कम्प्रोमाइझ झाले आहे. यामुळे ते पैसे मागणे किंवा खासगी माहिती विचारणे अशा कोणत्याही संशयास्पद मेसेजवर विश्वास ठेवणार नाहीत. याचसोबत, लगेच सेटिंग्जमध्ये जा आणि लिंक्ड डिव्हाइसेस तपासा. जर व्हॉट्सअॅप वेब किंवा इतर कोणतेही अनोळखी डिव्हाईस लॉग-इन दिसले, तर त्याला तात्काळ लॉग आउट करा.
हॅकरचा ताबा पूर्णपणे काढण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. तुमच्या फोनमधून व्हॉट्सअॅप लॉग-आउट करून पुन्हा लॉग-इन करा. री-लॉगिन करताना तुमच्या नंबरवर एसएमएसद्वारे वेरिफिकेशन कोड येईल. हा कोड टाकल्यास हॅकरचे जुने सेशन आपोआप डिस्कनेक्ट होईल. जर हॅकरने पुन्हा लॉग-इन करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला तो वेरिफिकेशन कोड लागेल, जो फक्त तुमच्याकडे असेल.
कायदेशीर आणि तांत्रिक मदतीसाठी विलंब न लावता तक्रार करा. support@whatsapp.com या ईमेल आयडीवर आपल्या परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती देऊन मदत मागा. भारतात तुम्ही १९३० या नंबरवर कॉल करून किंवा अधिकृत सायबर क्राइम वेबसाइटच्या माध्यमातून तातडीने ऑनलाईन तक्रार नोंदवा.
जर तुम्हाला शंका असेल की तुमचे सीम स्वॅप झाले आहे किंवा मोबाइल नंबरचा ताबा दुसऱ्या व्यक्तीकडे गेला आहे, तर ही सर्वात गंभीर परिस्थिती आहे. त्वरित आपल्या नेटवर्क ऑपरेटरशी संपर्क साधा आणि सीम ब्लॉक/रिकव्हरी करून घ्या. अनेकदा हॅकर सीमवर नियंत्रण मिळवूनच अकाउंट हॅक करतात.
अकाउंट परत मिळाल्यावर भविष्यातील सुरक्षेसाठी 'टू-स्टेप वेरिफिकेशन'हे फीचर चालू करा आणि एक पिन सेट करा. केवळ व्हॉट्सअॅपचेच नाही, तर जीमेल किंवा अन्य सोशल मीडिया अकाउंट्स सारख्या व्हॉट्सअॅपशी जोडलेल्या सर्व सेवांचे पासवर्ड त्वरित बदला. बँक अकाउंट आणि युपीआय ॲप्सवर अलर्ट चालू ठेवा आणि कोणत्याही अनधिकृत व्यवहारांवर त्वरित लक्ष द्या.
जागरूकता हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, तुमचा ओटीपी कोणालाही देऊ नका आणि नियमितपणे लिंक्ड डिव्हाइसेस तपासा. थंड डोक्याने आणि तत्परतेने पाऊल उचलल्यास तुम्ही मोठे नुकसान टाळू शकता!