सोने, चांदी, तांबे, अॅल्युमिनियम...दुर्मिळ धातूंपासून बनतो iPhone; पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 02:12 PM2023-09-14T14:12:22+5:302023-09-14T14:28:52+5:30

अॅपलच्या iPhone ची किंमत खूप जास्त असते. पण, फोन बनवण्यासाठी वापरलेल्या वस्तुही खूप महाग आहेत.

आयफोनचे नवे मॉडेल बाजारात येताच त्याबद्दल ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढते. जेव्हा जेव्हा अॅपलचा नवीन आयफोन बाजारात येतो तेव्हा तेवढीच उत्सुकता दिसून येते. असे मानले जाते की आयफोन सर्वोत्तम वस्तुंपासून तयार केला जातो. यामध्ये जगातील अनेक धातू वापरले जातत. यात महाग आणि दुर्मिळ धातुंचाही समावेश आहे.

Apple ने आपलाय बहुप्रतिक्षित iPhone 15 सीरीज लॉन्च केली आहे. या नवीन लॉन्चमुळे अॅपल सीरीजचे काही जुने फोन स्वस्तही झाले आहेत. दरम्यान, तुम्हाला ऐकून नवलं वाटेल की, आयफोन बनवताना स्क्रीनपासून बॅटरीपर्यंत, अनेक धातूंचा वापर केला जातो. त्यापैकी बरेच महाग धातू आहेत. यामुळेच आयफोनची किंमतही इतर फोनपेक्षा जास्त असते.

आयफोनमध्ये अंदाजे 30 रासायनिक घटक आहेत, ज्यात अॅल्युमिनियम, तांबे, लिथियम, चांदी आणि सोन्याचा समावेश आहे. याशिवाय, यात पृथ्वीच्या पोटात आढळणारे काही दुर्मिळ घटकही असतात. आयफोनचा कॅमेरा सॅफायर ग्लासचा बनलेला आहे, तर त्याच्या बॉडीसाठी विशेष प्रकारचा अॅल्युमिनियम वापरण्यात येते. हे अॅल्युमिनियम स्क्रॅचपासून संरक्षण करते.

आयफोन सोन्या-चांदीने बनलेला आहे, असे म्हटल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. फोनच्या इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये सोने, चांदी, तांबे आणि टंगस्टन वापरले जातात, तर मायक्रो कॅपेसिटर टॅंटलमचे बनलेले असते. फोनचे प्रोसेसर चिप सिलिकॉनची बनलेली आहे. याशिवाय, यात ग्रेफाइट, कोबाल्ट, लिथियम आणि अॅल्युमिनियमचा वापर केला जातो. फोनची बॅटरी लिथियम कोबाल्ट ऑक्साईडपासून बनवलेली आहे. 60 टक्के बॅटरी कोबाल्ट आणि इतर धातूंनी बनलेली असते.

आयफोनचा आवाज इतर कोणत्याही मोबाइल फोनपेक्षा स्पष्ट आणि चांगला आहे. यासाठीही उच्चप्रतिचे धातू वापरले जातात. यामध्ये निकेल, बोरॉन, लोह, डिस्प्रोशिअम आणि निओडीमियम या धातूंचा वापर केला जातो. उपकरणाला कंपन होण्यास मदत करण्यासाठी निओडीमियम आणि डिस्प्रोशिअम सारख्या दुर्मिळ घटकांचा वापर केला जातो.

मोबाईलची पारदर्शक स्क्रीनदेखील अनेक धातू मिसळून बनवली जाते. आयफोनची स्क्रीन सर्वात खास आहे. ही अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, इंडियम, टिन आणि अनेक दुर्मिळ धातूंचे मिश्रण करून बनविली जाते. त्यामुळेच आपल्याला आयफोनच्या स्क्रीनवर अतिशय स्पष्ट दृष्य दिसतात. ही दिसायलाही आकर्षक आहे.

फक्त आयफोनच नाही, तर इतर मोबाईलमध्येही कमी-अधिक प्रमाणात धातूंचा वापर केला जातो. पण, या धातूंमुळे पर्यावरणाचे खूप नुकसान होते. युरोपियन केमिकल सोसायटीच्या रिपोर्टनुसार, स्मार्टफोनमध्ये सात घटकांचा (कार्बन, य्ट्रिअम, गॅलियम, आर्सेनिक, सिल्व्हर, इंडियम आणि टॅंटलम) सतत वापर केल्याने शरीरावर गंभीर परिणाम पडत आहेत. आयफोनबद्दल असेही म्हटले जाते की, हा फोन सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणारा फोन आहे.