इंटरनेटचा गेम चेंजर! मेटा भारतात आणणार वेगवान कनेक्टिव्हिटी, समुद्राखालून केबल टाकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 11:36 IST2025-10-10T11:16:42+5:302025-10-10T11:36:37+5:30
Meta Waterworth Cable In India : भारतात इंटरनेटचे स्पीड आणखी वाढणार आहे. यासाठी मेटा कंपनी पुढाकार घेणार आहे. मेटा सुमद्राखालुन केबल टाकण्याचे काम सुरू करणार आहे.

Meta Waterworth Cable In India : भारतात इंटरनेटचे स्पीड आणखी वाढणार आहे. यासाठी मेटा मोठी तयारी करत आहे. मेटा अब्जावधी डॉलर्सच्या समुद्राखालील केबल प्रकल्प "वॉटरवर्थ" साठी मुंबई आणि विशाखापट्टणम हे लँडिंग साइट बनवणार आहे. या हालचालीमुळे भारताच्या इंटरनेट गती आणि डेटा पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय बदल होऊ शकतो, याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो.
मेटा'ने भारतातील या प्रकल्पासाठी सिफी टेक्नॉलॉजीजची लँडिंग पार्टनर म्हणून निवड केली आहे. हा करार सुमारे ५ मिलियन डॉलर किमतीचा असू शकतो.
मेटाच्या या प्रकल्पामुळे भारतात डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये टेक कंपन्यांची गुंतवणूक वाढत आहे. यापूर्वी गुगलने भारतात ब्लू-रामन सबसी केबल जोडण्यासाठी सिफी टेक्नॉलॉजीजसोबत भागीदारी केली होती. विश्लेषकांच्या मते, हे सर्व करार जागतिक डेटा नेटवर्कमध्ये भारताचे वाढते धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करतात.
META चा “वॉटरवर्थ” प्रकल्प आता जगातील सर्वात लांब पाणबुडी केबल सिस्टीम बनण्यास सज्ज आहे. ही केबल ५०,००० किलोमीटरपेक्षा जास्त लांब आहे आणि एकाच वेळी अमेरिका, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांना जोडणार आहे.
एक महत्वाची गोष्ट म्हणजे, हा प्रकल्प रेड सी कॉरिडॉरला बायपास करेल, ज्यामुळे डेटा ट्रॅफिक अधिक सुरक्षित आणि जलद होईल. ही केबल २०३० पर्यंत कार्यान्वित होऊ शकते, ज्यामुळे भारतासह अनेक देशांना भविष्यातील डिजिटल नेटवर्कमध्ये मोठा फायदा होईल.
मेटाचा हा प्रकल्प भारतासाठी गेम-चेंजर ठरू शकतो. कॅलिफोर्नियास्थित ओपनकेबल्स इंक.चे संस्थापक सुनील तगारे म्हणाले की, या प्रकल्पात पुढील ५-१० वर्षांत अंदाजे १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होऊ शकते, यामध्ये एआय डेटा सेंटर क्षमता निर्माण करणे याचा समावेश आहे.
भारतातील सबमरीन केबल इकोसिस्टम सध्या लक्षणीय विस्तारातून जात आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सारख्या देशांतर्गत टेलिकॉम कंपन्या देखील केबल सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मेटा आणि गुगलच्या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीमुळे देशात डेटा सेंटरची भरभराट होईल, यामुळे देशांतर्गत डेटा कंपन्या आणि सिफी आणि लाईटस्टॉर्म सारख्या कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.