Pandharpur : आकर्षक विद्युत रोषणाईने 'दुमदुमली पंढरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 09:35 PM2021-07-17T21:35:35+5:302021-07-17T21:49:43+5:30

श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आषाढी यात्रा २०२१ निमित्त पंढरी नगरीत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईने पंढरी दुमदुमल्याचं दिसून येतं.

आषाढी यात्रा दरवर्षी आषाढ शुध्द एकादशी या दिवशी भरते. सन २०२१ यावर्षी आषाढी मंगळवार २० जुलै, २०२१ रोजी आहे. या दिवशी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक श्रीची शासकीय महापूजा केली जाणार आहे.

मुख्यमंत्री यांच्या सोबत श्रीच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी श्रीच्या दर्शन रांगेतून निवडला जातो व त्यांना शासक महापूजेची संधी दिली जाते. तथापि, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, आषाढी यात्रा कालावध विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे.

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे विणेकरी यांची मुख्यमंत्रीच्या शुभहस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी माना वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता.

श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आषाढी यात्रा २०२१ निमित्त पंढरी नगरीत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईने पंढरी दुमदुमल्याचं दिसून येतं.

विठ्ठल- रूक्मिणीमातेच्या मंदिरावर, संत नामदेव पायरी, संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप व संत तुकाराम भवन येथे आकर्षक व नयनरम्य अशी विद्युत रोषणाई करण्यात आली.

कोरोनामुळे यंदा आषाढी वारीसाठी १० मानाच्या पालख्यांना परवानगी दिली. त्यासोबत २० ऐवजी ४० जणांना बसने जाण्यास परवानगी दिली. मात्र वाखरीपासून चालण्यास केवळ दोन वारकऱ्यांना परवानगी दिली आहे.

संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानकाका, संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ, संत चांगा वटेश्वर, संत निळोबाराय, संत नामदेवराय आधी राज्यातील दहा पालखी पंढरीत दाखल होणार आहेत.

या सोहळ्याला प्रत्येकी दोन बसमधून ६० वारकऱ्यांना वाखरी तळापर्यंत प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षीही प्रशासनाने आषाढी यात्रा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपाचा करण्याचे निश्चित केले आहे.

त्यानुसार मानाच्या दहा पालख्या व त्यामध्ये मोजक्याच भाविकांना आषाढी यात्रा एकादशीदिवशी पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार १७ ते २५ जुलैदरम्यान पंढरपुरात कडक संचारबंदी लागू केली आहे.

लाखो भक्तांच्या उपस्थितीत दैदिप्यमान होणारी आषाढी एकादशीचा सोहळा कोरोनामुळे यंदा दुसऱ्या वर्षीही साधारणपणेच साजरा होत आहे

पंढरीत दाखल होणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या, वारकऱ्याच्या मनातून विठुरायाला एकच साकडं घालण्यात येत आहे. ते म्हणजे पुढच्यावर्षी तरी पंढरीची वारी उत्साहात होऊ दे...