Arun Panwar: यूट्यूबरचं ग्रँड लग्न! सासरच्यांकडून ७१ लाख कॅश आणि २१ तोळं सोनं; लोक म्हणाले, "हा तर हुंडाच"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:18 IST2026-02-04T15:09:51+5:302026-02-04T15:18:27+5:30
Youtuber Arun Panwar Net Worth: गुरुग्राममधील प्रसिद्ध ऑटोमोबाईल यूट्यूबर अरुण पंवार याचं शाही लग्न सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

गुरुग्राममधील प्रसिद्ध ऑटोमोबाईल यूट्यूबर अरुण पंवार याचं शाही लग्न सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. इन्स्टाग्रामवर त्याने लग्नातील विधीचे काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत, जे जोरदार व्हायरल झाले.

अरुणने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये लग्न समारंभात त्याला ७१ लाख रुपये रोख आणि २१ तोळं सोनं मिळाल्याचा उल्लेख आहे. व्हिडिओमध्ये याला हुंडा न म्हणता 'दान' असं संबोधण्यात आलं आहे. हे पाहिल्यानंतर हुंडा प्रथेचा विरोध करणारे लोक सक्रिय झाले असून अरुण पंवारला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

व्हिडिओमध्ये लग्नात मिळालेल्या 'दाना'चा तपशील देताना एक व्यक्ती घोषणा करत म्हणते की- "हुंडा नाही तर केवळ दान म्हणून जे दिलं आहे ते पुढीलप्रमाणे आहे- मुलासाठी साडेपाच तोळ्याची सोन्याची चेन, ४ तोळ्यांचं ब्रेसलेट, २ अंगठ्या."

"मुलाच्या वडिलांसाठी चैन आणि अंगठी, मुलाचे काका आणि दोन्ही भावांसाठी सोन्याची अंगठी, पैंजण, जोडवी आणि मुलाच्या बहिणी, आई व वहिनीसाठी दागिने. एकूण २१ तोळं सोनं आणि ७१ लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आले आहेत."

सोशल मीडियावर या व्हिडिओमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. कोणी याला परंपरा मानत आहे, तर कोणी याला हुंड्याशी जोडत आहे. "हुंड्याला 'दान' असं नाव देऊन त्याचं समर्थन कसं काय केलं जाऊ शकते?" असा सवाल लोक विचारत आहेत.

काहींनी म्हटलं की, हे हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ नुसार गुन्हा आहे. एका युजरने लिहिलं, "लग्नात पैसे असो वा सोने, जे काही घेतलं जातं तो हुंडाच असतो. त्याला दान कसं म्हणता येईल?" अनेक युजर्सनी तर अरुणवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

अरुणच्या पत्नीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. "खूप शिक्षण घेऊनही ती हुंडा प्रथेला पाठिंबा कसा देऊ शकते?" असे युजर्स विचारत आहेत. दुसरीकडे, काही लोक यूट्यूबरच्या समर्थनार्थही उभे राहिले आहेत.

त्यांच्या मते, हे दान आपल्या इच्छेनुसार दिले गेले आहे, त्यामुळे याला हुंडा म्हणणं चुकीचं आहे. याच दरम्यान एकाने मजेत म्हटलं की, "हा नवरदेव तर विकला गेला", तर दुसऱ्याने लिहिले- "विकलं गेल्याबद्दल अभिनंदन."

अरुण हा ऑटोमोबाईल यूट्यूबर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीए (BCA) पूर्ण केल्यानंतर अरुणने २०१९ मध्ये आपलं यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. कारचे रिव्ह्यू करून तो प्रसिद्धीच्या झोतात आला.

आज त्याच्या यूट्यूब चॅनेलचे २.४१ मिलियन सबस्क्राइबर्स आहेत, तर इन्स्टाग्रामवर ९ लाख ७१ हजार फॉलोअर्स आहेत. तो अत्यंत आलिशान जीवन जगतो आणि त्याला महागड्या गाड्यांची आवड आहे. त्याच्या पत्नीचं नाव डॉक्टर तिथी असून तिने एमबीबीएस केलं आहे.

















