हरीश राणाशी अखेरचा संवाद साधणारी ‘ती’ महिला कोण?; अनंताचा प्रवास सुरू, कुटुंबासह देश भावुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 10:14 IST2026-03-16T10:00:18+5:302026-03-16T10:14:03+5:30

Harish Rana Last Video Viral: जा बाळा जा.. शांतपणे जा.. या शब्दांनी देशवासी भावुक झाले आहेत. अनेकांना अश्रु अनावर झाले आहेत. हरीश राणाशी शेवटचा संवाद साधणाऱ्या महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Harish Rana Last Video Viral: सर्वोच्च न्यायालयाने इतिहासात पहिल्यांदाच दयामरणाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. १३ वर्षे कोमात असलेल्या ३२ वर्षे वयाच्या एका व्यक्तीला जिवंत राखणारी कृत्रिम जीवरक्षक प्रणाली काढून घेण्यास न्यायालयाने संमती दिली. पुढील प्रक्रिया केली जात आहे.

गाझियाबादचा रहिवासी व पंजाब विद्यापीठाचा विद्यार्थी असलेला हरीश राणा हा २०१३ साली एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तेव्हापासून तो कोमात आहे. राणा याला पॅलिएटिव्ह केअरमध्ये दाखल करून त्याच्यावरचे वैद्यकीय उपचार थांबविण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे.

सगळ्यांना माफ करत आणि सर्वांची माफी मागत जा हरीश... आता तुझ्या वेदनांचे फक्त काही क्षण उरले आहेत, या अत्यंत भावूक शब्दांत ब्रह्माकुमारी भगिनींनी हरीश राणा याला अखेरचा निरोप दिला. भारताच्या कायदेशीर इतिहासातील ही पहिलीच घटना मानली जात असून, हरीशला दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये विशिष्ट पोशाख परिधान केलेली एक महिला हरीश राणा यांच्याजवळ उभी राहून त्यांचा अंतिम निरोप घेत असल्याचे दिसत आहे. आता जा, सर्वांना क्षमा करा आणि सर्वांची माफी माग. हे शब्द ऐकून लोकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. कमी कालावधीत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एवढ्या भावनिक क्षणी हरीश राणाशी अखेरचा संवाद साधणारी ती महिला कोण आहे?, यावर आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

व्हिडिओमध्ये दिसणारी महिला ब्रह्मकुमारींशी संबंधित एक साधिका आहेत. त्या साहिबाबादमधील मोहन नगर येथील ब्रह्मकुमारी केंद्र प्रभु मिलन भवनशी संबंधित आहे. बऱ्याच काळापासून आध्यात्मिक सेवेत सक्रिय आहे.

हरीशचे कुटुंब गेल्या दोन दशकांपासून ब्रह्मकुमारी केंद्राशी जोडलेले आहे. तो दवाखान्यात रवाना होण्यापूर्वी मोहन नगर येथील ब्रह्मकुमारी केंद्राच्या संचालिका बीके लवली दीदी आणि इतर भगिनींनी त्याच्या राजनगर एक्सटेंशन येथील घरी जाऊन निरोप दिला.

प्रिय हरीश, तू बोलू शकत नव्हतास की हसू शकत नव्हतास, पण तरीही तुझ्या आई-वडिलांसाठी तूच सर्वकाही होतास. आता तुझी या कष्टातून सुटका होण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत त्यांनी हरीशला निरोप दिला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.

अपघातानंतर हरीश कोमात गेला. तेव्हा कुटुंबाने आध्यात्मिक आधारासाठी ब्रह्मकुमारी केंद्राशी जोडले गेले. गेल्या काही वर्षांत, ब्रह्मकुमारी केंद्राशी संबंधित अनेक लोक वेळोवेळी राणा कुटुंबाला भेट देत आहेत. त्यांच्यासोबत प्रार्थना करत आहेत, मानसिक आधार देत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर हरीश राणा यांना आता इच्छामरण करावे लागेल हे स्पष्ट झाले, तेव्हा ब्रह्माकुमारी केंद्राच्या भगिनी कुमारी लवली दीदी या राणा कुटुंबाच्या घरी आल्या. घरातील वातावरण अत्यंत शांत आणि भावनिक झाले होते. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि समाजातील काही सदस्य उपस्थित होते.

भगिनी कुमारी लवली यांनी हरीश राणाच्या मस्तकावर चंदनाचा टिळा लावला. त्याच्या शेजारी उभ्या राहिल्या. प्रार्थना केली आणि शांत आवाजात अखेरचा संवाद साधला. ते शब्द ऐकून उपस्थितांना अश्रु अनावर झाले. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण भावनिक झाले आहेत.

ब्रह्मकुमारींच्या शिकवणींमध्ये क्षमा आणि आंतरिक शांतीला खूप महत्त्व दिले आहे. जीवनाच्या शेवटच्या क्षणी मन पूर्णपणे हलके आणि शांत ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मानले जाते. हे विचार व्यक्त करून भगिनी कुमारी लवली यांनी हरीश राणा यांना अखेरचा संदेश दिला.

सन २०१३ मध्ये चंदीगडमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना हरीश चौथ्या मजल्यावरून पडला होता. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि तो १०० टक्के अपंग झाला. तेव्हापासून तो अंथरुणावरच होता, त्याला नळीवाटे जेवण आणि श्वास दिला जात होता.