मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी पाहा ६ पदार्थ, आज डब्यात काय देऊ-प्रश्नच सोडवून टाका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 18:55 IST2025-06-11T15:31:27+5:302025-06-13T18:55:49+5:30

मुलांच्या शाळा आता नुकत्याच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना डब्यात काय द्यावं हा प्रश्न पुन्हा एकदा मुलांच्या आईंना पडायला लागलेला आहे.

कारण मुलांना काहीतरी वेगळं, चवदार हवं असतं. तेच ते पोळीभाजी त्यांना नको वाटतं. आणि त्याउलट आईला मात्र आपल्या मुलांनी पौष्टिक खावं असं वाटत असतं. म्हणूनच मुलांच्या डब्यासाठी हे काही पौष्टिक पर्याय पाहा. मुलांना हे पदार्थ खायला नक्कीच आवडतील.

इडली चटणी हा पदार्थ मुलं आवडीने खातात. त्यामुळे डब्यासाठी हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. शिवाय इडल्या करायला खूप वेळही लागत नाही.

अप्पे हा देखील एक चांगला पर्याय आहे. तुम्ही रवा, ओट्स किंवा डाळ- तांदळाचे अप्पेही करू शकता. ते अधिक पौष्टिक आणि चवदार होण्यासाठी टोमॅटो, पत्ताकोबी, सिमला मिरची, कांदा अशा भाज्या मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्या. आता ही भाज्यांची प्युरी अप्पे पिठात घाला. याचे अप्पे जास्त छान लागतात.

वेगवेगळ्या भाज्या किसून केलेले पराठे हा देखील एक चवदार आणि पोष्टिक पदार्थ होऊ शकतो.

पनीर पराठा, पनीरची भाजी, पनीर पकोडे असे पनीरचे वेगवेगळे पदार्थही बहुसंख्य मुलं आवडीने खातात.

मुगाच्या डाळीचे धिरडे हा देखील एक पौष्टिक पदार्थ आहे. त्यातून मुलांना चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतील. आलं, लसूण, कांदा, टोमॅटो यासोबतच इतर भाज्या घालून तुम्ही त्या धिरड्यांना आणखी चवदार बनवू शकता.

भरपूर भाज्या घालून केलेला पुलाव, मसालेभात खायलाही मुलांना आवडतं. पुलावमधल्या भाज्यांची चव वेगळीच लागते. त्यामुळे एरवी भाज्या न खाणारी मुलंही पुलाव, मसालेभातातल्या भाज्या आवडीने खातात.