National Handloom Day: भारतातल्या १० प्रसिद्ध हॅण्डलूम साड्या, सांगा यापैकी किती साड्या तुमच्याकडे आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2023 12:25 PM2023-08-07T12:25:43+5:302023-08-07T13:39:28+5:30

१. हातमाग उद्योग हा भारताच्या उत्तूंग सांस्कृतिक वारशाचं प्रतिनिधित्व करणारा उद्योग म्हणून ओळखला जातो. कित्येक यंत्रे आली पण अजूनही हातमाग उद्योग त्याचं वैभव टिकवून आहे. ७ ऑगस्ट १९०५ रोजी भारतीय क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध स्वदेशी चळवळ सुरू केली होती. त्याच्या तब्बल ११० वर्षांनंतर म्हणजेच २०१५ सालापासून ७ ऑगस्ट हा दिवस हातमाग दिवस म्हणून ओळखला जातो. हातमाग उद्योगाला नवी ओळख मिळावी, या उद्योगाविषयी जनजागृती व्हावी आणि त्याचं वैभव त्याला पुन्हा मिळावं, म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या पार्श्वभुमीवर आता भारतातल्या काही प्रसिद्ध हॅण्डलूम साड्यांचा आढावा घेऊया...

२. भारतातल्या विविध प्रांतांमध्ये हातमाग उद्योग माेठ्या प्रमाणावर केला जातो. पण हरियाणामधील पाणीपत हे शहर 'हॅण्डलूम हब ऑफ इंडिया' म्हणून ओळखलं जातं. 'City of Handlooms' अशी देखील या शहराची ओळख आहे. महाराष्ट्रातलं हातमाग क्षेत्रातलं एक प्रमुख शहर म्हणजे पैठण. पैठणची पैठणी (Paithani) जगप्रसिद्ध असून ५ ते ६ हजारांपासून ते अगदी लाखो रुपयांपर्यंत तिची किंमत असते.

३. आंध्र प्रदेशातली धर्मावरम साडी प्रसिद्ध आहे. टेम्पल आर्किटेक्चर हे या साडीचं वैशिष्ट्य मानलं जातं. मोर, कमळ, हत्ती, हरिण, चांदण्या असे या साड्यांच्या काठांवर असणारे प्रसिद्ध डिझाईन्स आहेत.

४. हातमाग क्षेत्रात आंध्र प्रदेशातील गढवाल सिल्क साडीचाही अव्वल क्रमांक आहे. कॉटन प्रकारातही ही साडी मिळते. इंटरलॉकिंग पद्धतीने केलेले विणकाम हे या साडीचं वैशिष्ट आहे. त्यालाच तिथल्या बोलीभाषेत कुट्टू असंही म्हणतात.

५. कर्नाटक इक्कत साडीसाठी ओळखलं जातं. ही साडीपण कॉटन आणि सिल्क अशा दोन्ही प्रकारात मिळते. या साडीचा पदर आणि नेसण्याची बाजू दोन्हीही वेगवेगळ्या विणल्या जातात आणि नंतर जोडल्या जातात.

६. हातमाग उद्योगात तामिळनाडूला कांचीपुरम किंवा कांजीवरम या साडीने ओळख दिली आहे. कोरवा या पद्धतीने साडीचं विणकाम केलं जातं. चौकडा, फुल, सूर्य, चंद्र, राजहंस, सिंह अशी नक्षी साडीवर दिसून येते.

७. हातमग क्षेत्रात केरळची कसावू साडी प्रसिद्ध आहे. साडीवर कमीतकमी वर्क केलेलं असतं आणि काठ मात्र भरजरी असतात.

८. तेलंगणाची पोचमपल्ली साडी देखील प्रसिद्ध आहे. टाय- डाय आणि विणकाम असं दोन्ही या साडीवर दिसून येतं. सिल्क, कॉटन आणि कॉटन- सिल्क ब्लेंड अशा तीन प्रकारात ही साडी उपलब्ध आहे.

९. बिहारची बावनबुटी साडी प्रसिद्ध आहे. बैल, कमळ, स्तूप, हरीण, हत्ती असं बुद्धिस्ट कल्चरशी मिळते जुळते डिझाईन या साडीवर दिसून येतात.

१०. हॅण्डलूम साड्यांमध्ये पश्चिम बंगालच्या बाटीक साडीला विसरूनही चालणार नाही. टाय- डाय प्रकारात ही साडी करण्यात येते. या साडीच्या प्रिंटिंगमध्ये मेणाचा उपयोग केला जातो.

११. लग्नासाठी अनेक नववधूंची पहिली पसंती मिळते ती बनारसी साडीला म्हणजेच शालूला. अतिशय हेवी वर्क हे या साडीचं वैशिष्ट्य असून अतिशय जुना प्रकार म्हणून बनारसी ओळखली जाते.