Maharashtra Food : झटपट करा ७ प्रकारचे पोहे, कांदे पोहे म्हणजे पोटभरीचं सुख-त्याहून भारी अस्सल चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2025 14:43 IST2025-08-13T14:37:20+5:302025-08-13T14:43:44+5:30

Maharashtra Food: Make 7 types of Poha in no time, with more authentic taste, traditional recipes : पोह्याचे विविध प्रकार नक्की करुन पाहा. चवीला छान.

नाश्त्याला काय करायचे ? अचानक घरी पाहुणे आल्यावर त्यांना खायला काय द्यायचे ? एखादा दिवस रात्रीच्या जेवणाला काहीच शिल्लक नाही मग पटकन काय करायचे ? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर पोहे असे अनेकांकडे असेल.

पोह्यांचे मस्त विविध प्रकार करता येतात. साधे फोडणीचे पोहे तर घरोघरी केले जातातच. मात्र त्याऐवजीही काही पदार्थ आहेत जे झटपट करता येतात. चवीला तर एकदम भारी असतात आणि करायलाही सोपे. पाहा पोह्यांच्या रेसिपी.

वांगी पोहे हा पदार्थ तसा फार लोकप्रिय नाही. अनेकांना माहिती ही नसतो. मात्र हा पोह्यांचा प्रकार म्हणजे एक पारंपरिक रेसिपी आहे. जी एकदा नक्की करुन पाहायला हवी. फोडणीच्या पोह्यांप्रमाणेच कृती असते मात्र चव जरा वेगळी लागते.

नारळाच्या दुधातले पोहे हा एक झटपट होणारा असा गोडाचा पदार्थ आहे. दुधात साखर पोहे भिजवायचे आणि मस्त मुरल्यावर खायचे अगदी सोपी आणि मस्त रेसिपी आहे.

दही पोहे हा पदार्थ गोकुळाष्टमीला खास केला जातो. गोपाळकाला करताना त्यात विविध पदार्थ घातले जातात. पोहे दह्यात भिजवून त्याला मस्त फोडणी दिली जाते. मस्त चविष्ट असा हा पदार्थ आंबट गोड तिखट सगळ्या चवींचे मिश्रण आहे.

काकडी पोहे पोटासाठी एकदम थंड आणि आरामदायी असा पदार्थ आहे. नाश्त्यासाठी लहान मुलांना खाऊ म्हणून द्यायला एकदम परफेक्ट आहे. करायलाही सोपा आहे आणि झटपट होतो.

दडपे पोहे तर सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. घरोघरी विविध पद्धतीने केला जातो. सगळ्याच रेसिपी एकदम मस्त लागतात. दडपे पोह्यांची खासियतच ही आहे की एखादा पदार्थ कमी असला तरी फरक पडत नाही ते छानच होतात.

कोळाचे पोहे हा कोकणात केला जाणारा एक वेगळा आणि भन्नाट असा पदार्थ आहे. चिंच, गूळ, पोहे, तिखटाची फोडणी आदींचे मिश्रण करुन एकदम मस्त असे कोळाचे पोहे करता येतात. साध्या पारंपरिक रेसिपी पौष्टिक तर फार असतात. तसाच हा पदार्थ.

श्रावणात फोडणीचे पोहे खाण्याची इच्छा झाल्यावर बटाटा पोहे केले जातात. हिरवी मिरची, कोथिंबीर, बटाटा असे पदार्थ वापरुन हे पोहे करता येतात. चवीला मस्त लागतात. वरतून छान ताजा नारळ घालायचा.