थेंबभर तेलातुपाशिवाय करा वाफवलेले ८ पदार्थ, पौष्टिक आणि पारंपरिक नाश्त्याचे पदार्थ खा पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2025 13:25 IST2025-08-17T13:21:06+5:302025-08-17T13:25:39+5:30

8 steamed dishes without a drop of oil, eat nutritious and traditional breakfast items, tasty food : नाश्त्याला करा मस्त चविष्ट पदार्थ. वाफाळलेले, गरमागरम आणि पौष्टिक.

एखादा पदार्थ करताना तो शिजवला जातो, परतला जातो, भाजला जातो तसेच वाफवलाही जातो. पाण्याच्या वाफेवर शिजणारे हे पदार्थ चवीला इतर पदार्थांपेक्षा वेगळे लागतात. तसेच डाएटसाठी साध्या भाज्याही वाफवून करणे फायद्याचे ठरते.

गुजराती ढोकळा हा पदार्थ मस्त वाफवून केलेला असतो. पारंपरिक पिवळा ढोकळा चवीला छान असतो. तसेच पांढरा ढोकळा करता येतो. विविध पिठांचा ढोकळा करता येतो. मूग डाळीचा ढोकळा करणे फार सोपे असते.

साऊथ स्पेशल इडली भारतात फार लोकप्रिय पदार्थ आहे. नाश्त्यासाठी इडली सांबार आणि चटणी हा बेत असेल तर दुपारचे जेवणही दोन घास कमी जाते. पोटभर इडली खावी.

महाराष्ट्रात केली जाणारी पानगी हा पदार्थ फार पौष्टिक असतो. केळ्याच्या पानांमध्ये वाफवून केला जाणारा हा पदार्थ गोड तिखट दोन्ही पद्धतींनी केला जातो. त्यासोबत लोणी आणि मिरचीचे लोणचे असेल तर चटणी करायची गरजच नाही.

मुटकुळे हा पदार्थ स्नॅक्स म्हणून खायला एकदम मस्त आहे. विविध प्रकारचे मुटकुळे करता येतात. कोबी, मेथी, कोथिंबीर, ज्वारी सारेच प्रकार चविष्ट असतात. तसेच पचायला हलके असतात.

महाराष्ट्रात केला जाणारा गोड केक म्हणजे ढोंडस. काकडीचा ढोंडस छान गोड असा पदार्थ आहे. करायला सोपा असतो आणि वाफवून केला जातो.

मध्यंतरी फार ट्रेंडिंग असलेला पदार्थ म्हणजे आप्पे. हा पदार्थ करायला सोपा आहेच त्यात तेल न घालता थोडे तूप घालून केले तर ते जास्त पौष्टिक होतात. त्यात भाज्या आणि मसाले घालून त्याची चव वाढवता येते.

उकडीचे मोदक वाफवून केले जातात. अर्थात मोदक हा काही पौष्टिक पदार्थ नाही. पण मोदक खाल्यावर मनाला मिळणारे समाधान काही औरच असते.

हळदीच्या पानावर केल्या जाणाऱ्या गोडसर पातोळ्या वाफवूनच केल्या जातात. नारळाचे चविष्ट सारण भरुन मस्त वाफवायच्या. तुपाची धार सोडून मजेने खायच्या.