महिलांसाठी सुपरफूड: आजी असो की नात.. प्रत्येकीने खायलाच हवे ५ पदार्थ- थकवा, अशक्तपणा येणारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2026 11:35 IST2026-01-05T11:27:44+5:302026-01-05T11:35:16+5:30

प्रत्येक वयोगटातल्या महिलांनी काही पदार्थ आवर्जून खाणं गरजेचं असतं. कारण या पदार्थांमुळे त्यांचं सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही उत्तम राहण्यास मदत होते.

ते पदार्थ नेमके कोणते याची माहिती आहारतज्ज्ञांनी aanse.fit या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. ते पदार्थ तुमच्या रोजच्या आहारात किती प्रमाणात असतात ते एकदा पाहून घ्या..

पपई हे फळ प्रत्येकीने रोज खायला हवं. त्यात भरपूर प्रमाणात फायबर आणि एन्झाईम्स असतात. त्यामुळे पचनक्रिया चांगली होते. अपचनाशी संबंधित कित्येक त्रास कमी होतात आणि शिवाय त्यात असणाऱ्या काही गुणधर्मांमुळे त्वचेचं सौंदर्यही खुलून येतं. पपई त्वचेला तरुण, टवटवीत आणि तजेलदार ठेवते.

व्हिटॅमिन सी चे पाॅवरहाऊस म्हणून ओळखले जाणारे आवळे भरपूर प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. केस गळणं आणि केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण कमी करतात. तसेच आवळ्यांमुळे चयापचय क्रियाही चांगली होते. यामुळे शरीरावर चरबी साचत नाही.

तिसरा पदार्थ आहे खजूर. त्यामध्ये लोह आणि नैसर्गिक साखर चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे इंस्टंट एनर्जी मिळण्यासाठी खजूर खूप उपयुक्त ठरतात. खजूर नियमितपणे खाल्ल्यास मासिक पाळीमध्ये होणारा त्रासही खूप कमी होतो.

कॅल्शियम, लोह आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असणारा शेवगाही नियमितपणे खायला हवा. त्यामुळे थकवा कमी होतो. हार्मोन्स संतुलित राहतात तसेच त्वचेसाठीही शेवगा उपयुक्त असतो.

डाळिंब देखील प्रत्येक वयाेगटातल्या महिलांनी खायलाच हवेत. रक्ताभिसरण चांगले होण्यासाठी आणि रक्तामध्ये लोह शोषून घेण्याचे प्रमाण वाढण्यासाठी डाळिंब उपयुक्त ठरतात. याशिवाय मासिक पाळीमध्ये होणारा त्रासही डाळिंब नियमितपणे खाल्ल्यास कमी होतो.