गॅस सिलेंडर मिळेल की नाही, टेन्शन आलंय? बघा ५ रेसिपी, गॅस पेटविण्याची गरजच नाही, गॅसची होईल बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2026 15:18 IST2026-03-11T15:11:15+5:302026-03-11T15:18:55+5:30

युद्धाचे परिणाम आता थेट आपल्या स्वयंपाक घरापर्यंत जाणवायला लागले आहेत. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर मिळण्याची चांगलीच पंचाईत होत आहे. त्यामुळे आता आपल्याकडे आहे ते गॅस सिलेंडर पुरवून पुरवून जास्तीतजास्त दिवस वापरण्याची गरज आहे.

त्यासाठीच आता आपण अशा काही रेसिपी पाहूया ज्या करण्यासाठी गॅसची गरज नाही. या रेसिपी तुम्ही दिवसातून एकदा जरी केल्या तरी बऱ्याच प्रमाणात गॅस वाचू शकताे आणि सिलेंडर जास्तीतजास्त दिवस चालू शकतं.

त्यापैकी पहिली रेसिपी आहे सॅण्डविच. भरपूर भाज्या घालून मस्त सॅण्डविच केलं की अगदी पोटभर नाश्ता होतो. शिवाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत तो सगळ्यांनाच आवडतो.

ब्रेड बटर, ब्रेड जॅम, ब्रेड सॉस, ब्रेड मेयोनिज अशा पदार्थांचाही तुम्ही नाश्त्यासाठी नक्कीच विचार करू शकता.

चटपटीत भेळ तर सगळ्यांच्याच आवडीची. भेळ करण्यासाठी गॅसची तर अजिबातच गरज नाही.

वेगवेगळी कडधान्ये भिजत घाला. त्याला चांगले मोड आणून घ्या. मोड आणलेल्या कडधान्यांची भेळ किंवा चाट करा... हा नाश्ताही खूप हेल्दी आहे. शिवाय घरातल्या सगळ्यांनाच तो आवडू शकतो.

नेहमीच भाज्या शिजवून घेतल्या पाहिजेत असं नाही. त्याला पर्याय म्हणून गॅस न पेटवता केलेली मेथी, करडईची कच्ची भाजीही खाऊ शकता. या भाजीत बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घाला. थोडं दही आणि चवीनुसार तिखट, मीठ घाला. दाण्याचा कूट घातला तरी चालेल. सगळं मस्त हलवून एकत्र केलं की झाला मेथीचा किंवा करडईचा घोळाणा तयार..

















