७ दिवस १ पदार्थ, न चुकता ‘यापैकी’ १ पदार्थ आठवड्यातून एकदा खा-तुमचं वजनच वाढणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2026 19:46 IST2026-02-03T13:11:14+5:302026-02-03T19:46:07+5:30

वजन कमी करण्यासाठी किंवा आहे ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी जवळपास प्रत्येकाचीच धडपड सुरू असते. तुमच्या वजनावर सगळ्यात जास्त परिणाम करणारी गोष्ट म्हणजे तुमचा आहार.

जर आहार उत्तम असेल तर वजन नियंत्रित राहण्यास आणि एकंदरीतच तब्येत उत्तम राहण्यास मदत होते. म्हणूनच आपल्या आहारात पुढे सांगितलेले काही अतिशय पौष्टिक पदार्थ असायलाच हवेत (best food for weight loss). आठवड्यातून एकदा तरी तुम्ही हे पाचही पदार्थ खायलाच हवेत, असं एक्सपर्ट सांगतात.(5 healthy Indian foods)

पौष्टिक पदार्थांपैकी एक आहे इडली सांबार. या पदार्थामध्ये फर्मेंट केलेले कार्बोहायड्रेट्स असतात. इडली पचायला हलकी असते. जेव्हा तुम्ही इडल्या भरपूर भाज्या घातलेल्या सांबारसोबत खाता तेव्हा तो एक संतुलित आहार असतो. कारण भाज्यांमधून फायबर, व्हिटॅमिन्स, खनिजे मिळतात तर डाळींमधून प्रोटीन्स मिळते.

दुसरा पदार्थ आहे खिचडी. मुगाची डाळ आणि भाज्या यांचं प्रमाण जास्त ठेवून केलेली खिचडी पचायला सोपी असते आणि शिवाय ती इम्युनिटी वाढायलाही मदत करते.

हरबरा डाळीचं धिरडं हा देखील एक अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. कारण त्यामधून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. त्यामुळेच जर तुम्ही नाश्त्यामध्ये धिरडं खाल्लं तर तुमची भूक आणि शुगर क्रेव्हिंग दोन्हीही नियंत्रणात राहाते. धिरडं करताना त्यात जर भाज्या घातल्या तर ते अधिक पौष्टिक होतं.

वरण किंवा डाळ, भाजी, पोळी, सलाड आणि दही असे सगळे पदार्थ तुमच्या पानात असतील तर तो देखील एक संतुलित आहार आहे. कारण त्यामधून प्रोटीन्स, फायबर, व्हिटॅमिन्स, खनिजे, प्रोबायोटीक्स, मायक्रोन्युट्रियंट्स आणि कार्ब्स असं सगळंच योग्य प्रमाणात मिळतं.

भाज्या घालून केलेला दलिया हा देखील एक चांगला पदार्थ आहे. कारण त्यातून फायबर चांगल्या प्रमाणात मिळते शिवाय त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने तो मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनाही चालतो. तसेच तो वेटलॉस करणाऱ्यांसाठीही योग्य आहार मानला जातो.