२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 15:14 IST2025-09-13T15:07:20+5:302025-09-13T15:14:53+5:30

GST Rate Cut on Home Construction: प्रत्येकाचे एक स्वप्न असते. एक टुमदार घर असावे, त्या घरासमोर एक कार असावी... ही दोन्ही स्वप्ने तुमची पूर्ण होऊ शकणार आहेत.

सर्वच गोष्टींवरील जीएसटी कमी झाला आहे. प्रत्येकाचे एक स्वप्न असते. एक टुमदार घर असावे, त्या घरासमोर एक कार असावी... ही दोन्ही स्वप्ने तुमची पूर्ण होऊ शकणार आहेत. तीन बेडरुमचे, चार बेडरुमचे घर बांधताना एवढे पैसे वाचणार आहेत, की त्यातून तुम्ही नवीन नाही परंतू एक सेकंड हँड गाडी जरूर घेऊ शकणार आहात. कारण सिमेंट, सळ्या, टाईल्ससह घर बांधण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूंवरचा जीएसटी येत्या २२ सप्टेंबरपासून कमी होणार आहे.

सिमेंटचा जीएसटी २८ टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच जागेवर सिमेंट १० टक्क्यांनी कमी झाले आहे. अशाप्रकारे घर बांधण्यासाठी लागणारी वीट, टाईल्स देखील १२ टक्क्यांवरून ५ टक्के जीएसटीवर आले आहे. यामुळे इथे सात टक्के वाचणार आहेत. लोखंडी सळ्यांचे देखील दर २८ वरून १८ टक्क्यांवर आले आहेत.

सिमेंटवर सध्या २८ टक्के जीएसटी आहे, नव्या जीएसटीनुसार ते १८ टक्क्यांवर आला आहे. एका सिमेंटच्या पोत्याचा दर जर ५०० रुपये असेल तर थेट ५० रुपयांनी सिमेट पिशवी कमी होणार आहे.

सध्या अनेकजण मातीच्या ऐवजी सिमेंटच्या विटा वापरतात. यावर पूर्वी १२ टक्के जीएसटी होता तो आता ५ टक्के झाला आहे. १० रुपयांना जर एक वीट मिळत असेल तर ती आता रुपयाने कमी मिळणार आहे. जर घर मोठे असेल तर तुमचे सध्याच्या दरानुसार १ लाख विटांसाठी १० लाख लागणार होते ते नंतर ९.३० लाख रुपये लागणार आहेत.

सिमेंटनंतर सर्वात मोठा खर्च असतो तो लोखंडी सळ्यांचा. यावरील जीएसटी १० टक्क्यांनी कमी झाला आहे. १ क्विंटल सळ्यांचा दर जर १०००० रुपये असेल तर जीएसटी कपातीनंतर तो १००० रुपयांनी कमी म्हणजेच ९००० रुपये होणार आहे.

टाईल्सचे दर १२ टक्क्यांवरून ५ टक्के झाले आहेत. म्हणजेच सात टक्क्यांनी कमी झाले आहेत. १०० रुपयांच्या टाईल्सवर ७ रुपये वाचणार आहेत.

म्हणजेच जर तुम्हाला तीन किंवा चार बेडरुमचे जवळपास २ ते २.५ हजार वर्गफुटाचे घर बांधायचे असेल तर आरामात २-२.५ लाख रुपये वाचणार आहेत. या वाचलेल्या पैशांतून तुम्ही एखादी छोटी वापरलेली कार देखील घेऊ शकणार आहात. किंवा यात आणखी दोन-तीन लाख घालून तुम्ही नवीन कार देखील घेऊ शकणार आहात.