'जिंकलंय आपण अण्णा'... शेतमजूर बापाला जेव्हा पोरगा तहसिलदाराच्या खुर्चीवर बसवतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 09:12 PM2021-08-03T21:12:35+5:302021-08-03T21:54:51+5:30

आपल्या यशात आई-वडिलांच्या कष्टाचं मोठं योगदान आहे, हे समाधान यांनी लक्षात ठेवलं. म्हणूनच, लांजा येथील आपल्या तहसिल कार्यालयात जेव्हा त्यांचे वडिल आले, तेव्हा वडिलांना खुर्चीवर बसविण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.

स्पर्धा परीक्षा म्हणजे सध्या मायाजाल बनलं आहे. एकीकडे शासनाकडून जागा निघत नाही, दुसरीकडे विद्यार्थी जागेच्या आशेवर आपलं करिअर पणाला लावत आहेत.

एमपीएससी परीक्षेमार्फत गतवर्षी निवड झालेल्या पण अद्यापही नियुक्त्या न मिळालेल्या उमेदवारांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केलं. तर, स्वप्नील लोणकर या तरुणानेही नियुक्तीच्या प्रतिक्षेत आपलं जीवन संपवलं.

स्पर्धा परीक्षेतीतील ही अनिश्चितता विद्यार्थ्यांचं मनोबल खच्चीकरण करते. 400 ते 500 जागांसाठी तब्बल 3-तीन लाख विद्यार्थी परीक्षेला बसलेले असतात. त्यामुळे, या परीक्षांची तयारी करताना आता बी प्लॅनही असायला हवा, असा सूर निघत आहे.

सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मोठा कल स्पर्धा परीक्षांकडे वाढला आहे. त्याला कारणही तसेच आहे. गेल्या 7 ते 8 वर्षात ग्रामीण भागातील तरुणांनी एमपीएससी आणि युपीएससी स्पर्धेत मिळवलेलं यश.

बांगड्या विकणाऱ्या आईचा मुलगा रमेश घोलप जेव्हा आयएएस बनला. तसेच, बँडवाल्याचा दगडे कुटुंबातील जीवन दगडे जेव्हा युपीएससी क्रॅक करतो, तेव्हा ही स्पर्धा आपलीच असल्याचं ग्रामीण भागातील तरुणांना वाटतं.

याच ध्येयातून ग्रामीण भागातील तरुण स्पर्धा परीक्षेकडे वळला आहे. त्यातून उस्मानाबाद जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातील अरणगावचा समाधान पाटील तहसिलदार झाला, उपजिल्हाधिकारी बनला.

आपल्या यशात आई-वडिलांच्या कष्टाचं मोठं योगदान आहे, हे समाधान यांनी लक्षात ठेवलं. म्हणूनच, लांजा येथील आपल्या तहसिल कार्यालयात जेव्हा त्यांचे वडिल आले, तेव्हा वडिलांना खुर्चीवर बसविण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.

आयुष्यभर तहसील कार्यालयाचे खेटे मारणाऱ्या वडिलांना लेकाच्या तहसिलदारपदाच्या खुर्चीवर बसताना आनंदाश्रू तरळले, तर अभिमानाने लेकाची छातीही 56 इंच फुगली होती.

समाधान यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले असून ते सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

सालगडी असलेल्या वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंदही आपल्या शब्दात व्यक्त केला आहे. अण्णा” तहसिलदाराच्या खुर्चीवर बसताना भावुक होताना आलेले आनंदाश्रू मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. अण्णा, आपण जिंकलोय... असे समाधान यांनी लिहिलं आहे.

समाधान हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्याचे रहिवाशी आहेत, त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण बार्शी आणि इंजिनिअरिंग पुणे येथे झालं आहे.