BhimJayanti: डॉ. बाबासाहेबांची पहिली जयंती पुण्यात, असा आहे भीमजयंतीचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 08:18 AM2022-04-14T08:18:18+5:302022-04-14T08:39:00+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या तळागाळातील लोकांना, अस्पृश्यांना मुख्य प्रवाहात आणले. कोट्यवधी कुळांचा उद्धार या महामानवाने केला. शिक्षण आणि साक्षर करुन समाज समृद्ध केला. म्हणूनच बाबासाहेबांची जयंती देशात सण-उत्सवाप्रमाणेच साजरी होते.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गुरुवार (14 एप्रिल) 131 वी जयंती. देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सर्वप्रथम या महामानवाला अभिवादन.

एक थोर समाजसुधारक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ओळखतो. बाबासाहेबांनी प्रत्येक विषयावर सखोल चिंतन व अभ्यास केला. आपल्या विचारांना विविध चळवळी व आंदोलनाच्या माध्यमातून मूर्त रूप दिले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या तळागाळातील लोकांना, अस्पृश्यांना मुख्य प्रवाहात आणले. कोट्यवधी कुळांचा उद्धार या महामानवाने केला. शिक्षण आणि साक्षर करुन समाज समृद्ध केला. म्हणूनच बाबासाहेबांची जयंती देशात सण-उत्सवाप्रमाणेच साजरी होते.

डॉ. बाबासाहेबांची ही जयंती सर्वप्रथम कोणी आणि कोठे साजरी केली, असा प्रश्न आपल्याला पडत असेल. तर, 14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा केला.

जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांच्या अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते. ज्या काळात शिक्षणाच्या सोयी वा सवलती उपलब्ध नव्हत्या त्या काळात पुणे जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले मॅट्रिक्युलेट झाले यातच त्यांचा मोठेपणा आहे.

बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा त्यांनीच सुरू केली. 1928 पासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. भारतात 14 एप्रिल ही दरवर्षी अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते.

खडकी पत्र विभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचे औचित्य साधत त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या.

खडकी भागात प्रत्येक वस्तीत आंबेडकरांची जयंती साजरी व्हायला लागली. या सर्व वस्त्यांचे भाऊसाहेबांनी एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली, या मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती भव्य प्रमाणात साजरी केली.

रणपिसे हेच या जन्मदिवस समारंभाचे ते जणू शिल्पकारच ठरले. म्हणून 24 ऑगस्ट 1958 रोजी रणपिसे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळीने पुणे शहरात त्यांचा सत्कार समारंभ घडवून आणला होता.

महार सेवादलाची त्यांनी स्थापना केली. तिचे ते कमांडर इन चीफ बनले. राजकारण त्यांनी जास्त केले नाही परंतु सामाजिक कार्याचे ते अध्वर्यू होते. समाजकार्यात त्यांचा मोठा वाटा आहे.