Gujarat: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंवर दुहेरी संकट; भाजपाची सत्ता राखण्याचं मोठं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 12:43 PM2021-09-12T12:43:45+5:302021-09-12T12:49:21+5:30

Gujarat Political Happening: गुजरातमध्ये भाजपाने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं आहे. पुढील येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने ही खेळी खेळली आहे.

भाजपाने गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून विजय रुपाणी यांना हटवलं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता नवीन चेहरा देण्याचा डाव भाजपाने खेळला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून गुजरातमध्ये भाजपा कमकुवत होत असल्याचं आढळलं आहे. भाजपाचे दोन्ही उच्च नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह गुजरातमधून येतात.

सूत्रांच्या माहितीनुसार, विजय रुपाणी नेतृत्वाखालील सरकारला एँन्टी इन्कम्बेंसीचा धोका होता. २०१२ च्या तुलनेत २०१७ मध्ये भाजपाची कामगिरी खालावली. त्यामुळे पक्षासमोरील आव्हानं वाढली. भाजपासाठी काँग्रेसच नव्हे तर आम आदमी पार्टीही तिथे मजबूत होत असल्याचं डोकेदुखी वाढली आहे.

यंदा झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत AAP नं खाते खोलले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टी गुजरातमध्ये आक्रमक प्रचार करण्याची योजना बनवत आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १८२ जागांपैकी केवळ ९९ जागा जिंकता आल्या.

चिंतेची बाब म्हणजे काँग्रेस १९९५ नंतर पहिल्यांदाच २०१७ मध्ये ७७ जागांवर विजयी झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या ६ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने ३ पोटनिवडणुकीत बाजी मारल्याने भाजपा नेतृत्वाचं टेन्शन आणखी वाढलं.

डिसेंबर २०२२ मध्ये गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. बहुमताचा आकडा ९२ आहे. आणि भाजपाकडे सध्या ९९ जागा आहेत. २०१७ च्या निवडणुकीत १६ जागांवर भाजपा ५ हजारांच्या मताधिक्याने जिंकली आहे.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ AAP नवीन आव्हान नाही. ममता बॅनर्जीची TMC पश्चिम बंगालमध्ये जबरदस्त विजयानंतर गुजरातकडे डोळे लावून आहे. तर असदुद्दीन ओवैसी यांची AIMIM गुजरातच्या महासंग्रामात उतरण्याची तयारी करत आहे.

दरम्यान, हार्दिक पटेल(Congress Hardik Patel) यांनी ट्विट करत म्हटलंय की, RSS आणि भाजपाच्या(BJP) अंतर्गत सर्व्हेत काँग्रेसचा विजय होत आहे. त्यासाठी विजय रुपाणी यांचा राजीनामा घेतला गेला. ऑगस्टमध्ये RSS आणि भाजपानं हा छुपा सर्व्हे केला. त्यात काँग्रेसला ४३ टक्के मतं आणि ९६-१०० जागा, भाजपाला ३८ टक्के मतं आणि ८०-८४ जागा, आपला ३ टक्के मतं, एमआयएमला १ टक्के मतं आणि इतर अपक्षांना १५ टक्के मतं आणि ४ जागा मिळताना दिसत होत्या असा दावा त्यांनी केला आहे.

जर या निवडणुकीत एँन्टी इन्कम्बेंसीचा फटका भाजपाला बसला आणि १६ जागा कमी आल्या. तर त्यांची संख्या ८३ इतकी होईल. तर ३२ जागा अशा आहेत ज्याठिकाणी तिसऱ्या नंबरवर असलेल्या उमेदवारांना मिळाली मतं विजय पराभवापेक्षा जास्त आहेत. अशा १८ जागांवर भाजपा विजयी झाली आहे.

एँन्टी इन्कम्बेंसीचा फटका बसला आणि भाजपाच्या जागा कमी झाल्या तर बहुमत गाठणंही पक्षाला कठीण होईल. त्यामुळे गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला ढासळायला वेळ लागणार नाही. त्यामुळे पक्षाचे नेतृत्व याबाबत विचारमंथन करून मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा घेतला आहे.

मागील वर्षभरात भाजपाने ४ मुख्यमंत्री बदलले. उत्तराखंडमध्ये काही महिन्यात २ मुख्यमंत्री बदलले. याआधी त्रिवेंद्र सिंह रावत आणि त्यानंतर तीरथ सिंह रावत यांनी पद सोडलं. आता पुष्कर सिंह धामी यांच्याकडे जबाबदारी आहे. अलीकडेच कर्नाटकात बीएस येदियुरप्पा यांना हटवून बसवराज बोम्मई यांना राज्याची कमान दिली.