अवघ्या १५व्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण; अनिश भानवालाची 'लक्ष्य'वेधी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 03:52 PM2018-04-13T15:52:16+5:302018-04-13T15:53:39+5:30

राष्ट्रकुल स्पर्धेत २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात अवघ्या १५ वर्षांच्या अनिश भानवालानं सुवर्णपदकाची कमाई करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणाऱ्या अनिशनं सुवर्णपदकाचा अचूक वेध घेत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून सर्वात कमी वयात सुवर्णपदक पटकावण्याचा विक्रम अनिशच्या नावावर जमा झाला आहे.

अनिश भानवालानं त्याच्या कारकिर्दीतली पहिलीवहिली राष्ट्रकुल स्पर्धा अनेक विक्रमांसह गाजवली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत ३० गुणांची कमाई करत अनिशनं नव्या विक्रमाची नोंद केली.

काही दिवसांपूर्वीच भारताची नेमबाज मनू भाकरनं १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. भारताकडून सर्वात कमी वयात सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रम मनूनं केला होता. मात्र अनिशनं मनूचा विक्रम मोडीत काढत नव्या विक्रमाची नोंद केली.