Bodybuilder Anil Bisht: जिद्दीला सलाम! नाइट शिफ्टचा कंटाळा आला म्हणून सुरू केलं होतं बॉडीबिल्डिंग अन् आता जिंकला थेट आंतरराष्ट्रीय पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 02:02 PM2022-11-07T14:02:57+5:302022-11-07T14:10:03+5:30

भारताच्या या पठ्ठ्याने भल्याभल्यांना दिली मात

Bodybuilder Anil Bisht: आजकाल तरूणांमध्ये बॉडी फिटनेस आणि जिमिंगची क्रेझ दिसते. लोक स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये जातात आणि व्यायाम करतात. काही तरुणांना फिटनेसचं इतकं वेड असतं की ते प्रोफेशन म्हणूनही या गोष्टीकडे पाहतात. असेच एक नाव आहे अनिल बिष्ट. मूळचा पौरी, उत्तराखंडचा असलेल्या अनिलने नुकतेच थायलंड येथे झालेल्या बॉडी बिल्डिंगच्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

अनिलने बांगलादेश आणि श्रीलंकेतील स्पर्धकांना पराभूत करून मिस्टर युनिव्हर्स (NBBUI) खिताब जिंकला. BPO कंपनीत नाईट शिफ्ट करत असताना प्रकृतीची काळजी घेत त्याने जिमिंग सुरू केली आणि नंतर बॉडी बिल्डिंग हा व्यवसायच स्वीकारला अन् त्यातून त्याने देशाचे नाव उंचावले.

असा घडला भारताचा बॉडीबिल्डर! अनिल बिष्टचे वडील भारतीय सैन्यात (Indian Army) कार्यरत आहेत. वडील सैन्यात असल्यामुळे अनिलचेही पालनपोषण त्याच शिस्तबद्ध वातावरणात झाले. अनिलने दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले. यासोबतच त्याने थ्रीडी अॅनिमेशनचा कोर्सही केला. ३ वर्षे त्याने दिल्लीतच एका बीपीओ कंपनीत काम केले. या दरम्यान, त्याला फिटनेसकडे लक्ष देण्याची गरज वाटू लागली.

त्यानंतर २०१० पासून त्याने जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. त्याला त्याच्या बहिणीच्या पतीने प्रेरणा दिली. जिममध्ये ट्रेनिंग करता-करता त्याने २०१३ मध्ये स्वतःची जिम उघडली आणि लोकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. २०१३ मध्येच त्याने बॉडी बिल्डिंगच्या पहिल्या स्पर्धेत भाग घेतला होता. तिथे तो तिसरा आला होता. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एकापाठोपाठ एक स्पर्धेत तो भाग घेत विजय मिळवत राहिला.

अनिलने मिस्टर इंडिया (IBBFF), मिस्टर यूपी, मिस्टर दिल्ली, मिस्टर हिमाचल यासह इतर अनेक खिताब जिंकले. हीच लय कायम ठेवत अनिलने थायलंडमध्ये ६० किलो वजनी गटात मिस्टर युनिव्हर्सचा किताबही पटकावला. त्याने बांगलादेश आणि श्रीलंकेतील स्पर्धकांचा पराभव केला.

बॉडी बिल्डर्सची जबरदस्त बॉडी, शेप साइज सिमेट्री लोकांना आवडते, पण त्यामागची मेहनत फक्त एका बॉडीबिल्डरलाच माहिती असते. बॉडी बिल्डिंग हे खूप मेहनतीचे काम आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःकडे खूप लक्ष द्यावे लागेल. जगापासून दूर, सर्वात जास्त लक्ष स्वत:वर केंद्रित करावे लागते. तसेच नाइटलाइफ, पार्टी आणि रुचकर जेवणा हे बाजूला ठेऊन उकडलेले अन्न खावे लागते. कधीकधी तर मीठ आणि पाणी देखील प्रमाणातच प्यावे लागते, असा अनुभव अनिलने आजतकशी बोलताना सांगितला.