"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 08:58 AM2024-05-06T08:58:13+5:302024-05-06T09:12:09+5:30

Lok Sabha Election 2024 : बारामतीच्या सभेत रोहित पवार हे शरद पवारांविषयी बोलताना भावूक झाले. त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले. यावरून अजित पवार यांनी रोहित पवार यांची खिल्ली उडवली.

Rohit Pawar has replied to Ajit Pawar after he mocks crying in Baramati, Lok Sabha Elections 2024 | "वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार

"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार

Rohit Pawar on Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होत आहे. काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी सभा घेत एकमेकांवर टीकेचे बाण सोडले. यावेळी बारामतीच्या सभेत रोहित पवार हे शरद पवारांविषयी बोलताना भावूक झाले. त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले. त्यांच्या भाषणाची ही क्लीप चांगलीच व्हायरल झाली. यावरून अजित पवार यांनी रोहित पवार यांची खिल्ली उडवली. मी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या सभेत भावनिक करण्याचा प्रयत्न केला गेला. आमच्या एका पठ्ठ्याने तर डोळ्यातून पाणी काढले. मी पण करून दाखवतो मला मतदान द्या, असे अजित पवार यांनी म्हटले होते. 

अजित पवारांच्या या टीकेला रोहित पवार यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. "अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण #ED ची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत. माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत… आणि त्यासाठी विचार, काळीज, जिवंत मन आणि अंगात माणूसपण असावं लागतं अजितदादा…. आणि हो… वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही", असा पलटवार रोहित पवारांनी केला आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. मी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या सभेत भावनिक करण्याचा प्रयत्न केला गेला. आमच्या एका पठ्ठ्याने तर डोळ्यातून पाणी काढले. मी पण करून दाखवतो मला मतदान द्या. असली नौटंकी बारामतीकर अजिबात खपवून घेणार नाहीत. रडणे म्हणजे हा झाला रडीचा डाव. हे असले इथे चालत नाही. त्यांना आम्ही जिल्हा परिषदेचे तिकीट दिले आहे. गळ्याची आण घेऊन सांगतो की, साहेबांनी द्यायला सांगितली नाहीत पण तरीदेखील मी दिली, अशी टीका अजित पवार यांनी रोहित पवारांवर केली. अजित पवार हे बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या सभेत बोलत होते. 

रोहित पवार काय म्हणाले होते? 
राष्ट्रवादीच्या फुटीनंतरचा किस्सा सांगताना रोहित पवार भावनिक झाले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर टीव्हीवर बऱ्याच बातम्या सुरू होत्या. तेव्हा शरद पवार साहेबांप्रमाणे आम्ही देखील सर्वकाही पाहत होतो. पण पवार साहेबांच्या भावना सर्वकाही सांगत होत्या. मात्र, परिस्थिती तशी असताना देखील त्यांनी काळजी करू नका असे आम्हाला सांगितले होते. रोहित पवारांनी शरद पवारांनी सांगितलेले शब्द उच्चारताना त्यांना अश्रू अनावर झाले. "जोपर्यंत लढण्यासाठी नवी पिढी तयार होत नाही तोवर मी डोळे मिटणार नाही", असे पवार साहेबांनी सांगितले असल्याचा खुलासा रोहित पवारांनी केला. त्यांनी हे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच सन्नाटा पसरला. सर्वजण स्तब्ध झाले... हा प्रसंग सांगताना रोहित पवार ढसाढसा रडू लागले. मग पुन्हा हे शब्द वापरू नका आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत, अशी ग्वाही रोहित पवार यांनी शरद पवारांना दिली. 

Web Title: Rohit Pawar has replied to Ajit Pawar after he mocks crying in Baramati, Lok Sabha Elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.