खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 09:42 AM2024-05-06T09:42:34+5:302024-05-06T09:42:58+5:30

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर आरोप. बारामतीच्या आधीच्या निवडणुकांमध्ये अजित पवार आमच्या सोबत होते, तेच सर्व निवडणूक हाताळायचे. त्यामुळे विजयात अजित पवारांचे योगदान मोठे असायचे, ही बाब सुप्रिया सुळेंनी मान्य केली.

If Ajit Pawar himself stands, then...; Important statement of Supriya Sule from Sunetra Pawar baramati lok sabha | खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य

खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : बारामतीसह राज्यात मोदी विरुद्ध गांधी, असा सामना असल्याचा दावा भाजपचे नेते करत असले तरी बारामती लोकसभा मतदारसंघात मात्र पवार विरुद्ध पवार, अशी लढत लावून शरद पवार यांचे राजकारण संपवण्याचा डाव भाजप खेळत आहे. म्हणूनच सुनेत्रा पवारांना निवडणुकीत उभे करण्यात आल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी लोकमत डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत केला. 

बारामतीच्या आधीच्या निवडणुकांमध्ये अजित पवार आमच्या सोबत होते, तेच सर्व निवडणूक हाताळायचे. त्यामुळे विजयात अजित पवारांचे योगदान मोठे असायचे, ही बाब सुप्रिया सुळेंनी मान्य केली. सोबतच इंदापूरचे दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील, दौंडचे राहुल कुल आणि थोरात यांची याआधीच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंना मदत झाली होती; पण यावेळी हे सर्व विरोधात आहेत. यामागे शरद पवार यांना संपवायचे हेच एकमेव कारण असल्याचे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीच जाहीर केलेय. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी हा भाजपच्या षड्यंत्राचा भाग आहे, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. 

पवारांमध्ये भांडण नसून वैचारिक लढाई सुरू आहे आणि जे काही पवारांमध्ये घडलंय ते एक राजकीय षड् यंत्र आहे. त्यामुळेच अजित पवार आणि आपलं राजकारण हे पूर्णपणे वेगळं झालंय. पुढंही ते तसंच राहील. राहिला प्रश्न शरद पवारांचा, तर ते संपणार नाहीत, असा दावादेखील त्यांनी केला.

बारामती लोकसभा मतदारसंघात सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांचे आमदार व इतर नेते महायुतीकडे आहेत. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, लोकसभा मतदारसंघात केलेली विकासकामे, मतदारसंघातील जनसंपर्क, संसदीय कामकाजातील सहभाग आणि कामगिरी, तसेच आपल्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाच डाग नसल्यामुळे लोकांची मते मिळवण्यात अडचण येणार नाही.

खुद्द अजित पवार उभे असते, तर... 
अजित पवारांनी महाराष्ट्राचं राजकारण पाहायचं आणि सुप्रिया सुळेंनी दिल्लीतलं राजकारण पाहायचं हे कुटुंबात ठरलं होतं. अजित पवारांना दिल्लीला जाण्यात कधीच रस नव्हता, तसेच सुनेत्रा वहिनी राजकारणात कधीच नव्हत्या. त्यामुळे त्या निवडणूक लढवतील, असा विचार केला नव्हता. त्यांनी कधी राजकारणात यायची इच्छा व्यक्त केली नाही. त्यांना निवडणुकीत उभं केलं गेलं. या निवडणुकीत खुद्द अजित पवार समोर उभे असते, तर आनंद वाटला असता, असेही सुळे म्हणाल्या. 

कुटुंबात भांडण नाही, वैचारिक लढाई   
पवार कुटुंबामध्ये फूट पडली आहे. निवडणुकीत विरोधात घरातील सदस्यच समोर उभा असल्याचे चित्र असले तरी पवार कुटुंबात भांडणे नसून, ही वैचारिक लढाई असल्याचे सुळे म्हणाल्या. 
दिल्लीतील नेत्यांना एक मराठी माणूस हा गल्ली ते दिल्ली त्यांच्याविरोधात लढतोय, हे सहन होत नाही. ते त्यांच्यासोबत जात नाहीत, झुकत नाहीत, म्हणून शरद पवारांना संपवण्याचे हे षड्यंत्र सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. 
बारामतीमध्ये भाजपकडे तगडा उमेदवार नसल्यामुळेच घर फोडा, पवारांचे खच्चीकरण करा, असे प्रयत्न केले गेलेत. प्रत्यक्षात सुनेत्रा पवार यांच्याऐवजी अजित पवार हेच स्वतः उमेदवार असल्याचे सुळे म्हणाल्या. 

Web Title: If Ajit Pawar himself stands, then...; Important statement of Supriya Sule from Sunetra Pawar baramati lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.