नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 20:14 IST2025-10-08T19:24:24+5:302025-10-08T20:14:50+5:30
Navi Mumbai International Airport take off details: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे आज पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले.

Navi Mumbai International Airport take off details:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (८ ऑक्टोबर २०२५) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. या टप्प्याचा खर्च सुमारे १९ हजार ६५० कोटी इतका आला आहे.
"आज मुंबईची दीर्घ प्रतीक्षा संपली. मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले. हे विमानतळ आशियातील सर्वात मोठे कनेक्टिव्हिटी हब बनेल," असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात व्यक्त केला.
सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत विकसित केलेला नवी मुंबई विमानतळ हा भारतातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून याला खूप महत्त्व आहे. मुंबई विमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी या नव्या विमानतळामुळे मोठा हातभार लागणार आहे.
नवी मुंबई विमानतळाची काही खास डिजिटल वैशिष्ट्ये आहेत. वाहन पार्किंग स्लॉटचे पूर्व-बुकिंग, ऑनलाइन बॅगेज ड्रॉप बुकिंग आणि इमिग्रेशन सेवा असे भारतातील हे पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ आहे.
विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) चे सीईओ अरुण बन्सल यांच्या मते, तुमच्या फोनवर कॅरोसेलवर तुमची बॅग कोणत्या क्रमांकावर आहे हे सांगणारा संदेशही येईल.
नवी मुंबई विमानतळावरून उड्डाणे कधीपासून सुरू होतील? असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. याचे उत्तर असे की, नवी मुंबई विमानतळावरून उड्डाणे डिसेंबर २०२५ मध्ये सुरू होणार आहेत.
प्रवाशांसाठी ऑक्टोबरच्या अखेरीस तिकिट विक्री सुरू होण्याची अपेक्षा आहे. इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांची विमाने येथून उड्डाण करतील. या विमानांच्या गंतव्य स्थानानुसार फ्लाईट शेड्युल ठरवले जाईल.