अपहरण झालेल्या जहाजावरून २१ जणांची सुटका करणारे ‘मार्कोस’ नेमके कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 01:38 PM2024-01-07T13:38:37+5:302024-01-07T14:04:51+5:30

‘मार्कोस’ कमांडोंनी थेट जहाजावर उतरत १५ भारतीयांसह २१ जणांची सुखरूप सुटका केली

MARCOS Navy marines, mv lila norfolk: अरबी समुद्रात सोमालियाच्या किनाऱ्याजवळ मालवाहतूक करणाऱ्या ‘एमव्ही लीला नॉरफॉक’ जहाजाचे शुक्रवारी अपहरण करण्यात आले होते. मात्र भारतीय नौदलाच्या ‘मार्कोस’ कमांडोंनी थेट जहाजावर उतरत १५ भारतीयांसह २१ जणांची सुखरूप सुटका केली.

अनेक आव्हानात्मक ऑपरेशन्सवेळी ‘मार्कोस’ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या मार्कोस कमांडोची निवड चार टप्प्यांमध्ये होते. जाणून घेऊया, ‘मार्कोस’ नेमके कोण आहेत, त्याबाबत...

पहिला टप्प्यात नौसेनेत कार्यरत असलेल्या जवानांची प्राथमिक चाचणी घेतली जाते. ही चाचणी इतकी कठोर असते की, ८० टक्के उमेदवार इथेच बाहेर पडतात. तर दुसऱ्या टप्प्यात १० आठवड्यांची चाचणी घेतली जाते. हे एकप्रकारे पात्रता प्रशिक्षणच असते. या काळात अनेक दिवस केवळ २-३ तासच झोप मिळत असल्याने २० टक्के जवान बाहेर पडतात.

पहिल्या दोन टप्प्यांत उत्तीर्ण झालेल्या जवानांना डोंगरचढाई, जमीन, पाणी आणि हवेत शत्रूंशी लढण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हा तिसरा टप्पा असतो. तो जवळपास तीन वर्षे चालतो. तर चौथ्या टप्प्यात जवानांना आधुनिक हत्यारे चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच मानसिक, शारीरिक आव्हानांचा सामना करण्यासह ११ किलोमीटर उंचीवरून उडी मारण्याचे शिकवितात.

२६/११ हल्ल्यावेळी ‘मार्कोस’ जवानांनी ‘ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅटो’ राबविले होते. त्याशिवाय १९८० मध्ये श्रीलंका युद्धावेळी ‘ऑपरेशन पवन’ केले होते. मालदीवमध्येही ‘ऑपरेशन कॅक्टस’ राबविले होते.

व्यापारी जहाजाच्या अपहरणाच्या प्रयत्नात सहभागी समुद्री चाच्यांना पकडण्यासाठी भारतीय नौदलाने उत्तर अरबी समुद्रात शोधमोहीम सुरू केली. भारतीय नौदलाने शुक्रवारी  लायबेरियन जहाज एमव्ही लिला नॉरफोकचे अपहरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि त्यातील चालक दलाच्या सर्व सदस्यांची सुटका केली. या जहाजाच्या मदतीसाठी नौदलाने युद्धनौका, सागरी गस्ती विमान पी- ८ आय, हेलिकॉप्टर तैनात केले होते.