कोण आहेत IPS स्वाती लकरा? ट्विटरवर का केलं जातंय त्यांचं अभिनंदन?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 09:05 PM2020-06-19T21:05:43+5:302020-06-19T22:09:29+5:30

ट्विटरवर तेलंगणातील वुमन सेफ्टी विंगच्या इनचार्ज आयपीएस स्वाती लकरा असे ट्रेंड करत आहे. ट्विटरवर त्यांचे अनेकजण अभिनंदन करत आहेत.

तेलंगणा सरकारने स्वाती लकरा यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या या महिला पोलीस अधिकाऱ्याला पाहून अनेक गुन्हेगारांना घाम फुटतो.

1995 बॅचच्या आयपीएस अधिकारी स्वाती लकरा यांनी लोरेटो कॉन्व्हेंट रांची येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे वडील दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्यरत होते. बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दिल्लीतील लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमन येथून पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी मिळविली.

लहानपणी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या स्वाती लकरा यांना सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी हेच ध्येय बनविले. त्यानंतर दिल्लीमध्ये राहून तयारी सुरु केली आणि आपले ध्येय गाठले. जेव्हा त्यांनी तेलंगणच्या वूमन सेफ्टी विंगचा पदभार स्वीकारला. त्यावेळी त्या सर्वाधिक चर्चेत आल्या होत्या. SHE टीम आणि ट्रस्ट सेंटर तयार केले होते.

SHE टीम तेलंगाना पोलिसांची एक विंग आहे, जी पाच लोकांच्या छोट्या-छोट्या समूहांमध्ये काम करते. हैदराबादच्या व्यस्त सार्वजनिक भागात या टीम प्रामुख्याने कार्यरत आहेत. टीमचे काम जलद कारवाई करण्याचे आहे. जर एखादी व्यक्ती घटनास्थळी महिलांची छेडछाड किंवा महिलांचा पाठलाग करत असेल तर त्याठिकाणी जाऊन संबंधित व्यक्तीलवर कारवाई करण्याचे काम ही टीम करते.

SHE टीमची सुरुवात 24 ऑक्टोबर 2014 मध्ये करण्यात आली. या मोहिमेचा उद्देश मुली आणि महिलांना संरक्षण प्रदान करणे हाच आहे. यामुळे मोहिमेचे कौतुक करण्यात येत आहे. तर महिलांच्या छेडछडीच्या घटना सुद्धा कमी झाल्या आहेत. त्यामुळे महिलांचा आत्मविश्वासही वाढला आहे.

2016 मध्ये लैंगिक हिंसाचारात पीडित महिला आणि मुलांसाठी एक-स्टॉप सपोर्ट सेंटर देखील लाँच केले. या सेंटरच्या माध्यमातून मुलांना लैंगिक गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी आणि बाल अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये मदत करण्याचे काम केले जाते.

ज्यावेळी असे खटले येतात, त्यावेळी काही औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. जसे की कोर्टात जावे लागते. पीडितेचे जबाब नोंदवावे लागतात. पीडितेला रुग्णालयात न्यावे लागते. याशिवाय, अशा परिस्थितीत पीडितेच्या मानसिक स्थितीची काळजी घेतली पाहिजे.

या व्यतिरिक्त, डिसेंबर 2017 मध्ये POCSO (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेंस) कायद्यानुसार चाइल्ड-फ्रेंडली कोर्ट तयार करण्यात आले. हे तेलंगणाच्या मुख्य कोर्टाबाहेर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे पीडितेला आरोपीसमोर आणले जाऊ नये याची काळजी येथे घेतली जाते. यासाठी एक वन-वे मिरर देखील आहे. जर मुलगा कोर्टात बसला असेल तर आरोपी वन वे मिररच्या बाहेर बसेल.

दरम्यान, महिला पोलीस अधिकारी होण्यासोबतच दोन मुलांच्या आई आणि पत्नीच्या भूमिकेत तितकाच स्वाती लकरा या यशस्वी आहेत. आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय स्वाती लकरा या त्यांच्या पालकांना देतात. माझ्या वडिलांची नोकरीमध्ये बदली होत असे, त्यामुळे आमच्या अभ्यासाची काळची आई घेत होती, असे स्वाती लकरा यांनी सांगितले.