संसदेत खासदारांचे माईक ऑन आणि ऑफ कोण करतं? वाचा याचे नियम आणि इंटरेस्टिंग माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 04:08 PM2023-03-17T16:08:27+5:302023-03-17T16:19:32+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्यानं आरोप करत आहेत की त्यांना संसदेत बोलू दिलं जात नाही. त्यांचा माईक बंद केला जातो आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनीही बुधवारी सभापती ओम बिरला यांना पत्र लिहून त्यांचा माईक तीन दिवसांसाठी बंद करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

याच आरोपांच्या फैरीत आता प्रश्न उपस्थित झाला आहे की अखेर संसदेत खासदारांचे माईक चालू आणि बंद करण्याचा अधिकार नेमका कुणाला असतो? हे काम कोण करत असतं? यासाठीचे नियम काय सांगतात? याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत.

संसदेतील दोन्ही सभागृहात म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेतील प्रत्येक सदस्याची आसन व्यवस्था निश्चित केलेली असते. प्रत्येक आसनाचा ठराविक क्रमांक असतो. संसदेच्या दोन्ही सभागृहात चेंबर असतं जिथं साउंड टेक्नीशियन उपस्थित असतात. हे सदनाशी निगडीत अधिकारी असतात जे लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज रेकॉर्डवर घेण्याचं काम करत असतात.

चेंबरमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतो जिथं माईक ऑन आणि ऑफ करण्याची सुविधा असते. चेंबरमध्ये लावण्यात आलेल्या मोठ्या काचेतून सभागृहात चाललेलं कामकाज तंत्रज्ञांना पाहता येतं. अधिकारी याच चेंबरमधून कामकाज पाहात असतात. लोकसभा सचिवालयाच्या कर्मचाऱ्यांद्वारे आणि वरच्या सदनात राज्यसभा सचिवालयातील कर्मचाऱ्यांद्वारे याचं व्यवस्थापन केलं जातं.

संसदेचं कामकाज कव्हर करणाऱ्या पत्रकारांच्या म्हणण्यानुसार मायक्रोफोन चालू आणि बंद करण्याची एक निर्धारित प्रक्रिया असते. सदनाच्या अध्यक्षांच्या आदेशानुसारच मायक्रोफोन बंद करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. सर्वसाधारणपणे सभागृहात गोंधळाच्यावेळी सभापती या अधिकाराचा वापर करतात आणि दोन्ही सदनातील माइक बंद केले जातात.

सभापतींच्या आदेशानुसारच ते सुरू केले जातात. ज्यावेळी एकादा सदस्य बोलण्यासाठी उभा राहतो तेव्हा सभापतींच्या निर्देशानुसारच संबंधित सदस्याचा माईक सुरू केला जातो.

संसदेत शून्य कालावधीतील चर्चेत सदस्याला बोलण्यासाठी तीन मिनिटांचा वेळ दिला जातो. सदस्याचं बोलणं सुरू झालं की तीन मिनिटांचा कालावधी सुरू होतो आणि तो पूर्ण झाला की माईक ऑटोमोडवर बंद होतो. जेव्हा एखादं बिल किंवा मुद्द्यावर चर्चा असते तेव्हा सर्व पक्षांना वेळ दिला जातो. सभापती आपल्या अधिकारानुसार सर्व सदस्यांना बोलण्यासाठी ठराविक वेळ देतात.

जेव्हा एखाद्या सदस्याची बोलण्याची वेळ नसते तेव्हा त्याचा माईक बंद केला जाऊ शकतो. जेव्हा सदस्याचा नंबर येतो तेव्हा त्याचा माईक सुरू केला जातो. विशेष कार्यकाळात खासदारांकडे बोलण्यासाठी २५० शब्दांपर्यंतचं भाषण वाचण्याची मूभा असते.

सदस्यांचे माईक चालू आणि बंद करण्यासाठी पूर्णपणे वेगळी आणि निष्णात टीम काम करत असते. दोन्ही सदनाच्या अध्यक्षांकडे याचे सर्वाधिकार असतात. साऱ्या गोष्टी सुचनेनुसारच होत असतात.